ठाणे : गायमुख कचर्‍यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ठरेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास
ठाणे
ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. समवेत महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : गायमुख येथील कचर्‍यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील दोन प्रकल्पांचे एकत्रिकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. तीन एकर जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

ठाणे शहर-घोडबंदर रोड परिसरातील चार विकासकामांची पाहणी शुक्रवारी (दि.14) सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या चार महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्याची कामे आता सुरू झाली आहेत. खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरिवडे मैदानाचा विकास, आनंद नगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टनांपर्यंतच्या ओल्या कचर्‍यापासून खत निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस एकूण 150 कोटी रुपयांचा निधी उपबल्ध झाला आहे. त्यात, मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथे एकूण 97 टन व नागला बंदर येथे 50 टन क्षमतेचा खत प्रकल्प तसेच, 1.5 टन क्षमतेच्या खतनिर्मितीच्या दोन मोबाईल व्हॅनचा समावेश आहे. राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर रेंज यांच्या मध्यभागी ही जागा असून प्रकल्पास वनखात्याची परवानगी मिळाली आहे. सुमारे 3 एकर जागेवर या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रीकरण करून गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील सर्व जागेचा वापर करून मोठा प्रकल्प कार्यान्वित करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.

नागला बंदर सुशोभीकरण...

नागला बंदर येथे राज्य शासनाच्या 150 कोटींच्या निधीतून मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारक स्थळाची पाहणी सरनाईक यांनी केली. तसेच, रहिवाश्यांशी संवाद साधला. या भागातील सर्व बाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन होईल, याची काळजी महापालिकेने घ्यावी. त्यांच्यासोबत बैठक घेऊन घरे, बोटींचे संवर्धन हे विषय मार्गी लावावेत. येथील स्थानिक हे एकप्रकारे कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

बोरिवडे मैदान विकास...

घोडबंदर रोड प्रभाग क्र. 1 मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्यायसाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ 84974 चौ. मी. असून त्यापैकी 6819 चौ. मी. क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यात विविध खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधा असतील. तर, मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट , व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसेच, मैदानाचे पूर्ण सपाटीकरण करणे, संरक्षक भिंत, आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे. मैदानालगतच्या तबेल्यांचे स्थलांतर करण्याबाबत सरनाईक यांनी महापालिका अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

आनंदनगर येथील उद्यान...

आनंद नगर येथे राज्य शासनाचा एक भूखंड म्हाडाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर महापालिकेच्या उद्यानाचे आरक्षण आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या भूखंडावर स्वामी समर्थ यांच्या मठासाठी रस्त्यालगत नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. त्याची पाहणी सरनाईक यांनी करत मठाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. ही जागा रिक्त करून तेथे उद्यानासाठी महापालिकेस सहकार्य करावे. उद्यानास स्वामी समर्थ यांचे नाव देण्यात येईल. या उद्यान व परिसराचे व्यवस्थापन मठाच्या माध्यमातून करावे. उद्यान सगळ्यांसाठी खुले राहील आणि त्यावर कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news