

डोंबिवली : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सोमवारपासून (दि.16) पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीच्या किमान तापमानातही लक्षणीय नोंद झाली असून कल्याण-डोंबिवलीचा पारा थेट 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
हवामान खात्याने सोमवारपासून (दि.16) पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान कमी होण्यास सुरूवात झाली असून काही ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. या घसरत्या वातावरणाचा परिणाम एमएमआर रिजनमध्येही जाणवू लागला आहे. सोमवारी बहुतांश ठिकाणी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
महाराष्ट्रात थंडीची लाट नसून इथले तापमान सामान्यापेक्षा 4 अंशांनी खाली घसरले आहे. तर केवळ पहाटेच्या सुमारास थंडीच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवली आहे. एकीकडे मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद जरी होत असली तरी दुपारच्या सुमारास मात्र एमएमआर रिजनमधील किमान तापमान तब्बल 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. दुपारचे तापमान सामान्य तापमानापेक्षा 2 ते 3 अंशांनी अधिक असल्याचेही अभिजीत मोडक यांनी सांगितले. तर पुढील 2 ते 3 दिवस असेच तापमान राहणार असून कमाल तापमान आणखी घसरण्याची आणि किमान तापमान असेच राहण्याची शक्यताही अभिजीत मोडक यांनी वर्तवली.
दरम्यान एकीकडे सर्वात कमी तापमान झाल्याने हुडहुडी भरली असतानाच दुपारी मात्र तितकेच कडक उन्हाचे चटके असे काहीसे विरोधाभासी वातावरण एकाच दिवसांत जाणवायला मिळणार आहे.
कल्याण : 12.8 अंश सेल्सिअस
डोंबिवली : 13 अंश सेल्सिअस
बदलापूर : 10.4 अंश सेल्सिअस
कर्जत : 10.5 अंश सेल्सिअस
अंबरनाथ : 11.5 अंश सेल्सिअस
ठाणे : 14.5 अंश सेल्सिअस
पालघर : 11.4 अंश सेल्सिअस
पनवेल : 12.8 अंश सेल्सिअस
विरार : 12.7 अंश सेल्सिअस
मुंबई : 14 अंश सेल्सिअस
नवी मुंबई : 13.6 अंश सेल्सिअस