

डोंबिवली : बजरंग वाळुंज
डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वेच्या सार्वजनिक शौचालयाचे फेरीवाल्यांकडून गोदामात रूपांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार प्रवाशांच्या नजरेस पडतो. परिसरातील फेरीवाले त्यांचे सामानसुमान चक्क या शौचालयात ठेवतात. परिणामी प्रवाशांना स्वच्छतागृहांमध्ये जाताना अडथळे पार करावे लागत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांचे या स्वच्छतागृहांवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची कायम वर्दळ असते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे कारवाई पथकाच्या ताफ्यासह पोलिस बळ असतानाही फेरीवाले हटविण्यात म्हणावे तितके यश येत नसल्याने डोंबिवलीकरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्टेशन परिसरातील रस्ते आणि फुटपाथ बळकावून बसणारे फेरीवाले सकाळी लवकरच विक्रीसाठी लागणाऱ्या सामानाचे गठ्ठे घेऊन रेल्वेच्या स्टेशन परिसरात येतात. केडीएमसीच्या ग आणि फ प्रभागाने फेरीवाला हटाव मोहिम तीव्र केली आहे. केडीएमसीच्या पथकांकडून फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात येत असते. मात्र आपले सामान सुरक्षित राहण्यासाठी फेरीवाल्यांनी शक्कल लढविली आहे. बाहेरून आणलेले काही सामान रेल्वेच्या स्वच्छतागृहांमध्ये लपवून ठेवले जाते. त्यातील विक्रीसाठी जितके सामान लागेल त्याप्रमाणे ते काढून घेतले जाते. उर्वरित स्वच्छतागृहांमध्ये ठेवले जाते.
डोंबिवलीच्या पूर्वेत ग आणि फ प्रभागांच्या फेरीवाला हटाव पथकांनी स्टेशन परिसरात संयुक्त कारवाई करून फेरीवाल्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ग प्रभागात कारवाई केली की हे फेरीवाले फ प्रभागात जाऊन बसतात. ग प्रभागाचे पथक कारवाई करून निघून गेले की ते पुन्हा ग प्रभागात येऊन बसतात. हा रोजचा दिनक्रम सुरू असल्याचे फेरीवाल्यांच्या पळापळीतून दिसून येते. बहुतांशी फेरीवाल्यांना काही राजकीय मंडळींचे पाठबळ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या राजकीय मंडळींमुळे डोंबिवलीच्या स्टेशन परिसरातील फेरीवाले हटू शकत नसल्याचे काही दक्ष डोंबिवलीकरांनी सांगितले.
फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यासाठी उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील काही कर्मचारी स्थानिक फेरीवाला हटाव पथकाला विश्वासात न घेता कारवाई करत असतात. त्यामुळे प्रभागांमध्ये वादाचे प्रकार सुरू झाले होते. मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथकातील 9 कामगारांच्या ताफ्यासह आवश्यक पोलिस बळ ग आणि फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले.
या दोन्ही प्रभागांनी मनावर घेतल्यास संयुक्त कारवाईतून डोंबिवली पूर्वेतील डोकेदुखी ठरलेला फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो. मात्र निर्ढावलेल्या फेरीवाल्यांकडून हिंसक पावित्रा घेतला जातो. तथापी आयुक्तांनी मनावर घेतल्यास बेकायदा फेरीवाल्यांचा सुफडा साफ होऊ शकतो. मात्र त्यासाठी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोट ग आणि फ प्रभागात एकत्रित बांधायला हवी, याकडे दक्ष आणि जागरूक प्रवाशांनी मागणी केली आहे. जर का आयुक्तांनी मनावर घेतल्यास डोंबिवलीचा रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त होण्यास फारसा वेळ लागणार नाही, असेही जाणकारांकडून सांगण्यात आले.