

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ही संस्था गेल्या 35 वर्षांपासून अनेक सामाजिक विधायक उपक्रम डोंबिवलीत साकारत आहे. निसर्ग संवर्धनाला प्राधान्य देणाऱ्या या क्लबने कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाजवळ उभारलेला चिऊ पार्क हा असाच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मानला जातो. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून अरण्य वाचनासाठी चिऊ पार्कला विद्यार्थ्यांनी भेट दिली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि पर्यावरण दक्षता मंचतर्फे संयुक्त उपक्रम राबविण्यात आला.
20 मार्च या जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून गुरूवारी सकाळी चिऊ पार्कमध्ये डोंबिवलीतील श्री गणेशनगर विद्यामंदिर शाळेतील पाचवी ते सातवीच्या जवळपास 70 विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह चिऊ पार्कला भेट दिली. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अरण्य वाचन हा उपक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना चिमणीविषयी माहिती देऊन या पक्ष्याचे पर्यावरणीय महत्त्व व त्यांचे अधिवास कसे वाचवू शकतो या विषयी माहिती देण्यात आली.
पक्षी, फूलपाखरे, वनसंपदा, इत्यादी विषयांवर मिळालेल्या उपयुक्त माहितीमुळे शिक्षकांसह विद्यार्थी प्रभावित होऊन त्यांनी निसर्गवाचनाचा आनंद घेतला. पर्यावरण दक्षता मंचतर्फे विद्यार्थ्यांना चिऊ पार्कात अधिवास असलेल्या वेगवेगळ्या पक्षांसह झाडे, फुलांची, तसेच निसर्गचक्रात त्यांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती देण्यात आली. पर्यावरण दक्षता मंचच्या प्रमुख रूपाली शाईवाले, वनस्पती अभ्यासक डॉ. श्रेया भानप, हेमांगी आणि समीक्षा यांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी नव्याने कळल्या. श्री गणेश विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका शीतल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील अशोक कोर, संगीता तुपे, संजय शिंदे, अश्विनी बडे, दर्शना म्हात्रे, निता भांगरे, सुलोचना काळे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात मोठा हातभार लावला.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्यावतीने क्लबचे माजी अध्यक्ष दीपक काळे, विद्यमान कार्यकारी अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, तसेच चिऊ पार्कच्या उभारणीच्या पहिल्या दिवसापासून जातीने लक्ष घालणारे डॉ. प्रल्हाद देशपांडे आणि चिऊ पार्कची निगराणी करणारा आदित्य कदम यांनी पाहुण्या विद्यार्थ्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी रो. दीपक काळे यांनी निसर्गसंवर्धनासह जागरूकतेसाठी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना संदेश दिला.