

बदलापूर : सावत्र भावाच्या पत्नीशी लग्न करण्यासाठी त्रास देणार्या सावत्र भावाला संतप्त झालेल्या भाऊ व त्याच्या पत्नीने त्याला जीव ठार मारून त्याचा मृतदेह गोणीत भरून रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची घटना बदलापूर जवळील वांगणी परिसरात समोर आली आहे.
मोहंमद आलम अन्सारी (24) असे मृत इसमाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बदलापूर जवळील थारोळगांव हद्दीत जिल्हा परिषद शाळेजवळ चरगाव रस्त्यावर उजव्या बाजूला असलेल्या पडिक जमिनीत त्याचा मृतदेह कुणीतरी प्लास्टिकच्या गोणीत भरून आणून टाकल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. कुळगांव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र तपासाला गती येण्यासाठी मयत इसमाची ओळख पटवणे आवश्यक होते. त्यात मयत परप्रांतीय असल्याने त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
मात्र पोलिसांनी वांगणी परीसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. आणि वांगणीतील चाळीमध्ये राहणार्या मूळच्या बिहार येथील 24 वर्षीय इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत मयत इसम हा त्याचा सावत्र भाऊ असल्याची व सावत्र भावाच्या पत्नीला त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे.
4 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजताच्या सुमारास मोहमद आलम त्याच्या सावत्र भावाच्या घरी आला होता. त्यावेळी त्याच्या सावत्र भावाच्या पत्नीने मोहमद आलमच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले, तर त्याच्या सावत्र भावाने त्याच्याशी झटापट केली. यात मोहमद याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रात्री 3 वाजताच्या सुमारास त्या दोघा पती-पत्नीने मोहमद आलम याचा मृतदेह प्लास्टिक गोणपाटात बांधून स्कुटीवर घेऊ न चरगाव रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची कबुली दिली. अवघ्या 72 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मोहमद आलमच्या हत्येप्रकरणी या दोघा पती-पत्नीला अटक करण्यात आली असून सपोनि गोविंद पाटील अधिक तपास करीत आहेत.