

ठाणे : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला असून यामध्ये ठाण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गाची घोषणा करत ठाणे शहरात 200 खाटांचे संदर्भ रुग्णालय उभारण्याचे देखील अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, बाळकुम गायमुख किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खर्या अर्थाने ठाणे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.
ठाण्यातील विकास प्रकल्पांना बळ देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी काही नव्या प्रकल्पांची घोषणाही त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली आहे. ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यात सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत कसे पूर्ण होतील, असा राज्य शासनाच्या प्रयत्न आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग प्रस्तावित करत ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, बाळकुम गायमुख किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. रस्ते वाहतूक, जलवाहतूक, किनारा मार्गांच्या पूर्णत्वानंतर ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक गतिमान होण्यास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे प्रवेशद्वार म्हणून ठाणे ओळखले जाते. देशातील सर्वाधिक नागरिकरण झालेला आणि होत असलेला जिल्हा म्हणूनही ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. शहरांच्या वेशीपर्यंत शहरांचा विस्तार झालेला आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान व्हावी यासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली गेली आहे. वडाळा-घाटकोपर- कासारवडवली ही मेट्रो 4, ठाणे-भिवंडी- कल्याण ही मेट्रो 5 आणि कल्याण-तळोजा ही मेट्रो 12 मार्गिका रेल्वे वाहतुकीला मोठा पर्याय ठरणार आहेत. त्याचवेळी भुयारी मार्ग, किनारी मार्ग, उन्नत मार्ग, खाडी पूल, महामार्गाचे विस्तारीकरण, अशा अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून काही प्रकल्पांची कामे देखील प्रगतीपथावर आहेत.
केवळ ठाणे नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या वाहतूक प्रकल्पांना चालना देण्याचे काम राज्याच्या अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीक्षेपात आले आहे. या विमानतळाला ठाणे शहराशी जोडण्यासाठी उन्नत मार्ग उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची शहरे विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. या उन्नत मार्गामुळे ठाणे-नवी मुंबई ही वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई आणि ठाणेपल्याडची शहरे एकमेकांना जोडण्यासाठी काटई-ऐरोली उन्नतमार्गाची उभारणी प्रगतिपथावर आहे. त्याच वेळी नवी मुंबई ते थेट बदलापूर अशा नव्या उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीए काम करते आहे. त्यामुळे या तीन उन्नत मार्गांमुळे ठाणे-नवी मुंबई आणि ठाणेपल्याडची शहरे असा प्रवास अधिक सोपा होणार आहे.
ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे शहरातील बाळकुम ते गायमुख असा 13.45 किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गासाठी 3 हजार 364 रुपये खर्चाची तरतूद असून हे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची घोषणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
येत्या 5 वर्षात ठाणे स्वयंपूर्ण करण्यासाठी ठाण्यात गुंतवणूक वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केले आहे. यासाठी शहरात आय टी सेंटर आणि डेटा सेंटर आणून या माध्यमातूनही रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणार्या ठाणेकरांना भविष्यात मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय यावर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या हॅपिनेस इंडेक्सवरही विशेष भर दिला असून ठाणेकरांना ठाण्यात राहावेसे वाटले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.