

भिवंडी : दोन मित्र ऑटो रिक्षाने डोंबिवलीहून भिवंडीत फेरफटका मारण्यासाठी भिवंडीत आले असता भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका युवकाचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील सुरई गावातील खाडी पुलावरील सार्वजनिक रस्त्यावरून समोर आली आहे. यश दिलीप वस्ते (19) असे अपघातात मयत पावलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी मयत यश याच्या आईच्या फिर्यादीवरून सदर अपघातास कारणीभूत ठरलेल्या रिक्षा चालक मित्राच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण किसन बिंगी (49) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत यश आणि आरोपी किरण हे दोघे डोंबिवली पश्चिम मधील तेलकोस वाडी येथील सजन स्मृती इमारतीत राहत असून एकमेकांच्या ओळखीतील आहेत. दरम्यान 3 जानेवारी रोजी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास किरण आणि यश हे दोघे किरण याची ऑटो रिक्षा क्र.एमएच 03 डीएस 0572 मध्ये बसून डोंबीवलीतून राऊंड मारण्यासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी रिक्षा सुरई येथील खाडी पुलावर आली असता किरणचा भरधाव रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा जोरात दुभाजकाला धडकल्याने अपघात होऊन यश आणि किरण रिक्षाच्या बाहेर फेकले गेले.
यामध्ये यश गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यास उपचारासाठी प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्यास अधिक उपचारा करिता डोंबीवली पश्चिम मधील सावंत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु तेथेही त्याची तब्येत चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने यशला मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता 11 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले आहे. याप्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी प्रथम नारपोली पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येवून चौकशी अंती चालक किरणच्या विरोधात भान्यासं 2023 चे कलम 106.281 सह मो.वा.का. कलम 134(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनि संतोष शिंदे करीत आहेत.