

भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या मुरबाडच्या मातीतील सैनिक अनिकेत जयदीप अढाइगे यास सोमवारी (दि.30) बेस्ट सोल्जर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे मुरबाडच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तोरा रोवला गेला असून या वार्तेने तालुक्यात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
फौजी अनिकेत सध्या मणिपूर येथे कर्तव्य बजावत आहे. मणिपूर हिंसाचार नियंत्रित राखण्यासाठी भारतीय लष्कराची महत्त्वाची भूमिका आहेत. जीवाची बाजी लावून सैनिक येथे संरक्षण देत आहेत. याच कामगिरीची दखल घेऊन फौजी अनिकेत यांस बेस्ट सोल्जर हा लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. अवघ्या बालपणापासून सैन्य दलात देशसेवेचे ध्येय बाळगून असलेल्या अनिकेतने परिस्थितीवर मात करून अखेर सन 2019 मध्ये भारतीय सैन्य दलात आपली जागा पटकावली. आर्थिक, मानसिक व तांत्रिक अडचणींमुळे त्याला यापूर्वी काही वेळा अपयश पत्करावे लागले. मात्र यावर खचून न जाता अनिकेतने आपला सराव कायम ठेवत यशाची वेस गाठल्याने, एका खासगी शाळेत ट्रेनर म्हणून पार्ट टाईम काम करून आपल्या कुटुंब खर्चाला हातभार लावणारा अनिकेत अनेक अपयशी युवकांना प्रेरणादायी ठरला आहे.
अनिकेतचे वडील जयदीप अढाईगे हे पत्रकारीता करतात. तर आई रंजना अढाइगे परिचारिका असून सद्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत आहे. तर अनिकेतने या यशाचे श्रेय आईवडीलांना दिले आहे. तसेच यासाठी त्याचे शिक्षक, मित्रमंडळी, मार्गदर्शक यांचे देखील आभार मानले आहे. यासंदर्भात अनिकेतच्या आईवडीलांशी संवाद साधला असता, अनिकेतने लहानपणापासून देशसेवेचा ध्यास घेतला होता. त्याच्या जिद्द, मेहनत व चिकाटीने तो त्यांच्या धेय्यापर्यंत पोहोचला आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही देशसेवे करिता आमचा मुलगा घडवू शकलो.