

Thane Crime 17 year old boy sets girlfriend on fire:
ठाण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीसोबत झालेल्या वादानंतर एका १७ वर्षीय मुलाने तिला पेटवून दिले. या घटनेत मुलगी ८० टक्क्यांहून अधिक भाजली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कापूरबावडी पोलिसांनी या १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासह वास्तव्यास असलेली ही मुलगी आणि आरोपी मुलगा एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचे मैत्रीचे संबंध होते.
पीडित मुलगी तिच्या दुसऱ्या घरी चेंबूर येथे गेल्यावरून आरोपी मुलासोबत तिचा वाद झाला होता. या वादातून त्याने तिला मारहाण देखील केली होती, त्यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करून तिला वाचवले होते. या घटनेनंतर आरोपी मुलाने मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, मुलगी घरी एकटी असताना, तिचा मित्र असलेला हा तरुण मुलगा तिच्या घरात शिरला. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. काही काळानंतर घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर आसपासच्या रहिवाशांनी मुलीच्या घरच्यांना कळवले.
मुलीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना ती भाजलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी आरोपी मुलगा देखील घटनास्थळी हजर होता. नातेवाईकांनी त्याला जाब विचारताच त्याने तेथून पळ काढला.
या घटनेनंतर मुलीच्या आई-वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती ८० टक्के भाजली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत.