

टिटवाळा : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील शहाड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाच्या कारभारामुळे दिव्यांग, वयोवृद्ध आणि महिलांना रोजचा प्रवास महाकठीण झाला आहे. स्टेशनच्या तिकीट घरापासून तब्बल 300 ते 350 मीटर अंतरावर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या दोन दशकांपासून उल्हासनगर पालिकेच्या जागेवर अनधिकृत पार्किंग सुरू होते. त्यातून रेल्वे अधिकार्यांनाही आर्थिक फायदा मिळत असल्याची चर्चा होती. मात्र, पालिकेच्या उपायुक्त पवार यांनी धाडसी कारवाई करून हे पार्किंग हटवले आणि अधिकृत पार्किंग सुरू केले. ही बाब रेल्वेला पटली नाही आणि त्यांनी तिकीट घरापासून बर्याच अंतरावर बॅरिकेड्स लावून प्रवाशांना पर्यायी मार्गाने जाण्यास भाग पाडले.
या बॅरिकेड्समुळे दिव्यांग व वयोवृद्धांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी फायरब्रिगेड किंवा रुग्णवाहिकेला प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नाही. नुकत्याच एका प्रवाशाला अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका आणण्यात खूप वेळ गेला. यापूर्वी 2021 मध्ये स्टेशनला आग लागल्याचाही कटू अनुभव प्रवाशांनी घेतला आहे.
प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव शहाडमार्गे उल्हासनगरला मोफत रेशन घेण्यासाठी येतात. अशा वेळी त्यांना एवढे अंतर चालून जावे लागणे ही बाब त्यांच्यासाठही त्रासदायक आणि अन्यायकारक ठरत आहे.
या निर्णयाविरोधात प्रवाशांनी तक्रारी केल्या असून रेल्वे मंत्रालय व वरिष्ठ अधिकार्यांकडे दाद मागितली आहे. याबाबत रेल्वे अभियंता ललित सोंळकी यांनी सांगितले की, मंडळ रेल्वे प्रबंधकांच्या आदेशानुसारच बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.