

शहापूर : महावितरण अधिकार्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहापूर तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. करोडो रुपयांची वीजबिल वसुली असताना तुटपुंजा कर्मचारी वर्ग गाडा हाकत असून मागील चार दिवसांपासून तालुक्यातील निम्मे गाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील धसई फिडरवरील शेलवली, धसई, कासगाव, नडगाव, शिरगाव, भटपाडा, शेंदृण, लेनाड, नेहरोली, जांभे, खुटघर, कोळकवाडी, दहीवली, टेंभरे, ठीले, हिव, दोर्याचा पाडा, गोकुळगाव आदी गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणार्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे.
एकूणच सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकार्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, तालुक्यात विजवितरणचा भोंगळ कारभार सुरू असून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी साजरी करत असताना येथील नागरिकांना सलग तीन-तीन दिवस अंधारात राहावे लागत असल्याने विद्युत वितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
शहापूर तालुक्यातील विद्युत वितरण कार्यालयातील उप अभियंता अविनाश कटकवार या कार्यक्षम अधिकार्यांनंतर एकही अधिकारी कार्यक्षम वाटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सामाजिक कार्यकर्ते,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना वेळोवेळी विजेसंबंधी समस्यांबाबत माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करत होते.मात्र कटकावर यांची बदली झाल्यानंतर तालुक्यातील विजेच्या तक्रारी वाढत असून वीज ग्राहकांना सुरळीत सेवा पुरवली जात नसल्याचा आरोप होत आहे.