

ठाणे : ताडपत्री वापरून उभारलेली झोपडी, तिच्या छिद्रांतून गळणारे पावसाचे पाणी, आजूबाजूला साचलेल्या डबक्यातील डासांपासून आरोग्याला धोका, उन्हाळ्यात प्रचंड उकाडा, हिवाळ्यात अंगाला बोचणारा गारठा, हातात कागदपत्रांचा गठ्ठा आणि एसआरए कार्यालयाच्या येरझरा घालून झिजलेली चप्पल... एसआरएच्या भोंगळ कारभारामुळे 65 वर्षीय मनोहर भाऊ भोईर आपल्या हक्काच्या घरासाठी गेल्या आठ वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र न्याय मिळण्याऐवजी तारीख पे तारीख मिळत असल्याने हतबल भोईर यांनी “माझ्या हक्काचं घर देता का घर?” असा सवाल या यंत्रणेला केला आहे.
ठाणे शहरातील चंदनवाडी परिसरात प्रभुदास चाळ येथे मनोहर भोईर यांना वारसा हक्काने मिळालेले घर होते. याठिकाणी 2017 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला असून, भोईर यांनी चंदनवाडी येथील हनुमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घर मिळणार होते. या सोसायटीच्या परिशिष्ट -2 च्या पात्रता यादीत अनु. क्र. 91 वर त्यांचे नाव होते. त्यांना -002 हा रूम अलॉट झाला. मात्र प्रत्यक्षात भोईर यांना घराच्या किल्ल्या मिळण्यापूर्वीच एका महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी या घरावर अतिक्रमण करत घराचा ताबा घेतला. भोईर यांनी सांगितले की, “मला यादीमध्ये अलॉट झालेल्या रूमवर मानसी उमेश महाडिक या महिलेने ताबा मिळवला.” 2010 मध्ये तिने भोईर यांची झोपडी विकत घेतल्याचा दावा केला. मात्र असा कोणताही कायदेशीर विक्री व्यवहार झाला नसून आपली फसवणूक झाल्याचे भोईर म्हणाले. त्यांनतर हा वाद नागरी न्यायालयात गेला. न्यायालयाने या घरावर “स्टेटस क्वो” आदेश दिला. मात्र आता हे प्रकरण निकाली निघण्याऐवजी एसआरएकडून न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून असहकार्य केले जात आहे. मागील 8 वर्षांपासून भोईर यांनी ठाणे महापालिका, एसआरए, सहकारी निबंधक व राज्य मंत्र्यांकडे आपली तक्रार मांडली. त्यांनी महानगर- पालिका, एसआरए अधिकाऱ्यांकडील त्रासाबाबत तक्रारही केली. 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पत्राद्वारे त्यांची तक्रार एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली, ज्यामध्ये “अमानवीय वागणूक” दिल्याचा उल्लेख होता. यावर सुनावण्या घेतल्या, कागदपत्रे मागवली, चौकशी आदेश दिले, परंतु ठोस कार्यवाही झाली नाही.
2019 मध्ये एसआरएने भोईर यांना क्रमांक 91 व 43 संबंधित झोपड्यासंदर्भात पुन्हा बोलावले. सहाय्यक निबंधकांनी 2024 मध्ये कळवले की, 2017 मधील लॉटरीमध्ये फ्लॅट-002 वाटप भोईर यांना झालाच आहे, परंतु नागरी वाद व स्टेटस क्वो आदेशामुळे प्रत्यक्ष हक्क मिळाला नाही.
संघर्षाच्या काळात पत्नीही मृत्युमुखी
सध्या कोर्टाचा निर्णय येईपर्यंत एसआरएही काही करू शकत नाही. याच संघर्षाच्या काळात भोईर यांची पत्नीही मृत्युमुखी पडली. तरीही दुःखाचा डोंगर पचवून त्यांचा आठ वर्षांपासून लढा सुरूच आहे. या काळात मदत सामाजिक संस्थेच्या संचालिका शशी अग्रवाल या देखील भोईर यांच्यासोबत या लढ्यामध्ये उतरल्या असून, एसआरए ठाणे विभागाचे संदीप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.