ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोढा अमरा या सहा मजली इमारतीच्या छतावर याच इमारतीच्या सिक्युरिटी सुपरवायझरचा शीर कापलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने सोमवारी (दि.16) रोजी सकाळी परिसरात खळबळ उडाली. सोमनाथ देबनाथ (30, रा. कोलशेत, ठाणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याच इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या व्यक्तीने ही हत्या केली असल्याचे तपासातून समोर येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कापूरबावडी परिसरात असलेल्या लोढा आमरा या उच्चभ्रू इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवर सोमनाथ याचे शीर हे धडावेगळे केलेल्या अवस्थेत सोमवारी (दि.16) रोजी सकाळी आढळून आले.
सोमनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तसेच त्याच्या हाताच्या खांद्यावर, डोक्यावर आणि गालावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. ही घटना समोर येताच इमारतीत राहणार्या रहिवाशांमध्ये व परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह कापूरबावडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. दरम्यान इमारतींमधील सर्व सीसीटीव्हींची पडताळणी पोलिसांनी केली असता मयत सोमनाथ आणि या इमारतीत लिफ्टमन असलेला दुसरा सुरक्षारक्षक असे दोघे रविवारी (दि.15) रोजी रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान इमारतीच्या गच्चीवर जाताना सीसीटीव्हीत आढळून आले.
त्यानंतर सुरक्षारक्षक हा एकटाच गच्चीवरून खाली येताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो त्याच्य दिवशी त्याच्या घरी देखील पोलिसांना तो आढळला नाही. त्यामुळे ही हत्या दुसर्या सुरक्षा रक्षकाने केली असावी असा पोलिसांना संशय असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.