

डोंबिवली : कल्याणच्या पूर्व भागातील प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या निवासीसह व्यापारी संकुलातील मालमत्तांना सिल केले. या मालमत्ताधारकांकडे कराची 36 लाख 44 हजार 835 रूपयांची थकबाकी आहे. वारंंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नसल्याने 3 / क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व अधिक्षक उमेश यमगर यांच्या पथकाकडून थकबाकीदारांच्या गाळे आणि मालमत्तांना टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली.
आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड आणि कर निर्धारक व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी प्रभाग स्तरावरील कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर थकबाकीदारांकडील कर रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे मालमत्ता कर वसुली थंडावली होती. येत्या तीन महिन्यांच्या काळात मालमत्ता कर वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण करायाचा असल्याने दहा प्रभागांतील सहाय्यक आयु्क्त दररोज कर थकबाकीदारांच्या मालमत्ता शोधून त्यांना टाळे लावण्याची कारवाई करत आहेत. ग, फ, अ प्रभागात ही कारवाई अधिक जोमाने सुरू आहे. मालमत्तांना टाळे लावल्यानंतरही थकबाकीदारांनी थकित रक्कम भरणा केली नाहीतर केडीएमसीकडून थकबाकीदारांच्या मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर लिलाव प्रक्रिया करून या मालमत्तांमधील कर थकबाकी वसूल केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गोविंदवाडीतील मुसा बिल्डींगमध्ये राहणारे शेख मुसा शेख नासीर यांची 1, 2, 3 व 5 क्रमांकाची दुकाने 10 लाख 66 हजार 375 रूपये थकबाकीपोटी सील करण्यात आली. आग्रा रोडला असलेल्या येथील बोरगांवकर टॉवरमधील धुरापतारी गुप्ता यांची मालमत्ता 91 हजार 532 रूपये थकबाकीपोटी सील करण्यात आली. याच रोडला असलेल्या ममता टॉवरमधील ईश्वरलाल वेलाणी, एम. आर. पटेल, एस. आय. वेलाणी आणि एन. आर. रंगाणी यांच्या मालमत्ता 3 लाख 16 हजार 780 रूपये इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले. टिळक चौकात लेले आळीतील स्वप्निल ईरांडे यांची मालमत्ता 17 लाख 89 हजार 499 रूपये थकबाकीपोटी सील करण्यात आली. केतन मांडे यांच्या 17 लाख 89 हजार 499 रूपये थकबाकीपोटी सील करण्यात आले. लाल चौकी परिसरातील बारकू धोंडू ठाकरे यांची मालमत्ता 3 लाख 7 हजार 736 रूपये इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले.