

ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी ४ व ५ जुलै रोजी 'रेड अलर्ट' जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनाने शनिवार, 4 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
या निर्णयानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रांसह मुरबाड व शहापूर तालुक्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह सर्व संबंधित महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान विभाग व प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.