ठाणे : ढोल-ताशांचा गजर, त्याला लेझीमची साथ, कुणी बाईकवर, कुणी गाडीत, कुणी बग्गीत, तर कुणी सायकलवर स्वार तर कुणी पायी-पायी... पोषाख मात्र पारंपरिक, मराठमोळ्या बाण्याचा आणि मनात उत्साह तोच चैत्रपालवीसारखा... ठाणेकरांनी अशा मराठमोळ्या पद्धतीने नववर्षाचे उत्साहात, जल्लोषात स्वागत केले.
ठाण्यात नववर्ष अशा जल्लोषात, उत्साहात साजरे करण्याची ही पंरपरा श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने सुरू केली. या गुढीपाडव्याला या पंरपरेला 25 वर्षे पूर्ण झाली. या यात्रेचा तोच बाज आणि उत्साह ठाणेकरांनी टिकवून ठेवला, त्याची प्रचिती रविवारी (दि.30) ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या स्वागतयात्रांनी दिली.
बच्चे कंपनीही या यात्रेत सहभागी झाली. यावेळी कुणी छत्रपती शिवाजी महाराज, कुणी अहिल्याबाई, तर कुणी सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. शहरातील 60 हून आधिक संस्थांनी सहभागी होत दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक, सांस्कृतिक संदेश दिले.
जांभळी नाका येथील श्री कौपीनेश्वराचे दर्शन करून या यात्रेला ठाणेकरांनी प्रारंभ केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, यात्रेचे स्वागताध्यक्ष शरद गांगल, श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे उत्तम जोशी, अश्विनी बापट, तनय दांडेकर, संजीव ब्रम्हे, विद्याधर वालावलकर, भरत अनिखिंडी, वंदना विव्दांस, कुमार जयवंत आदी सहभागी झाले होते. ही यात्रा हरिनिवास सर्कल येथे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेवर पुष्पवृष्टी केली.
यात्रेत यंदा भगवान शंकराची व नंदीची रथावर विराजमान झालेली मूर्ती ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. सरस्वती विद्या मंदिरातील छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यात्रेचे संचलन केले. हिंदू जागृती न्यासाच्या वतीने घंटाळी देवीच्या पालखीचा यात्रेत सहभाग होता. शिख, पारशी, जैन समाजाचे बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी झाले होते. सीकेपी समाजाच्या वतीने यात्रेत चित्ररथावर मोबाईल आणि ई जगामुळे मुले मैदानी खेळ विसरली, अशा आजच्या काळावर समर्पक भाष्य करणारा देखावा केला होता. मनशक्ती केंद्राचा चित्ररथ मुलांना परीक्षेची वाटणारी भीती यावर होता. ठाणे जनता सहकारी बँकेने मराठीला अभिजात भाषेच्या मिळालेल्या दर्जा मिळाल्याने बँकिंग प्रणालीत होणारा मराठी शब्दांचा वापर यावर चित्रमय देखावा सादर केला. ठाणे महापालिकेच्या शिक्षण, घनकचरा, आरोग्य विभागानेही माहिती आणि जाणीव जागृतीपर माहिती चित्ररथाद्वारे दिली. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील सदस्य पारंपरिक पोषाखात यात्रेत सहभागी झाले होते. मराठा मंडळाच्या वतीने माय मराठीचा जागर यावेळी करण्यात आला. एकलव्य संस्थेच्या वतीने चित्ररथावर मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
कर्नाटक सांस्कृतिक मंचचे कार्यकर्ते पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यावर आधरित चित्ररथाचाही यात्रेत समावेश होता. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने लहान मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यावर जागृती करणारा संदेश चित्ररथाद्वारे दिला. ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने यात्रेच्या मार्गावर पाणी, शीतपेय, नाष्ट्याचे वाटप करण्यात येत होते. याशिवाय ठाणे वारकरी प्रतिष्ठान, सार्वजनिक शिवजयंती मंडळ, शारदा मंदिर, पर्यावरण दक्षता मंच, भगिनी निवेदिता मंडळ, संभाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, गायत्री परिवार, दधिची देहदान, जय मल्हार मंदिर ट्रस्ट अशा 60 हून अधिक चित्ररथांचा यात्रेत सहभाग होता.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारने दोन-तीन महिन्यांपूर्वीच विजयाची गुढी उभारली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ही गुढी विकासाची, समृद्धीची, लाडक्या बहिणींची, लाडक्या शेतकरी, लाडक्या भावांची ही गुढी आहे. भविष्यामध्ये राज्यासाठी विकासाचे पर्व आणले आहे. राज्यात उद्योगांना लाल गालिचे अंथरले आहेत. अर्थव्यवस्थेत देखील आपली स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. विदेशी गुंतवणूकदार राज्यात येत आहेत, कारण येथील वातावरण चांगले आहे. पाडव्याच्या दिवशी देखील आम्ही सर्वसामान्यांचा विचार करत असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागतयात्रा तीन पेट्रोल पंपापासूनच विस्कळीत झाली. हरिनिवास सर्कल, नौपाडा, राम मारूती रोड येथे पालखी पुढे, लेझीम ढोल - ताशा पथके पुढे तर यात्रेतील अनेक चित्ररथ यांच्यात चांगलेच अंतर पडले होते.
रविवारी (दि.30) ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक असलेले नौपाडा भागातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रकाश पायरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.