डोंबिवली : कल्याणमध्ये बनावट दुग्धजन्य पदार्थ होत असल्याची घटना समोर आली आहे. बनावट तूप आणि बटर (लोणी) ची विक्री करणार्या भिवंडीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांकडून 125 किलो तूप आणि 30 किलो बटरचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
सद्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्राहकांकडून साजूक तुपाची मागणी वाढली आहे. त्यामुळे तेला-तुपाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याच संधीचा फायदा घेत नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट दुग्धजन्य पदार्थांची बाजारात विक्री करण्याच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.
कल्याण पश्चिमेकडील किल्ले दुर्गाडी परिसरात एक महिला व पुरूष तूप आणि बटर (लोणी) विक्री करत होती.ही खबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मिळाली. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी अशा पद्धतीने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या या प्रकाराची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या अधिकार्यांना सूचना दिल्या. त्यानुसार गफूर डॉन चौकात एका नामांकित कंपनीचे तूप आणि बटर अवैधरित्या विक्रीकरिता आणणार असल्याची माहिती बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांना मिळाल्यानंतर बाजार व परवाना विभागाचे प्रशांत धिवर यांच्यासह कर्मचार्यांना तपासणीकरिता धाडले.
चौकशी दरम्यान हारून रशीद आणि तौसिफ काझी हे दोघे गाडीतून बटरचे दोन बॉक्स (अंदाजे 30 किलो) व तूपाचे पाच बॉक्स (अंदाजे 125 किलो) घेऊन किराणा दुकान विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात परवाना विचारण्यात आला असता ते समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. मात्र तूपाच्या बिलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे संशय बळावला. जप्त दुग्धजन्य पदार्थांची शुध्दता तपासणीकरिता त्यांच्याकडील बटर आणि तुपाच्या पिशव्या बाजार व परवाना विभागाने ताब्यात घेतल्या. हा साठा ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक बाजारपेठ पोलिसांकडे पत्रव्यवहारासह सुपुर्द करण्यात आल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले.