

ठाणे : प्रतिजौविक (अॅन्टी बॉयोटिक्स) म्हणून विक्री होणाऱ्या औषधांमध्ये त्याची मूळ घटकद्रव्ये नसतांना तसेच केवळ कागदोपत्री उत्पादकांची नावे ठेवून औषधांची विक्री करून फसवणूक करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील दोन औषध वितरकांकडून सुमारे दोन कोटींचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बीड, कोल्हापूर, ठाणे या ठिकाणी सध्या या औषधांची तपासणी सुरू असून या जिल्ह्यातील वितरकांकडे या औषधांचा आणखी साठा आहे का याची तपासणी अन्न आणि औषध प्रकरणी सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे.
औषध प्रशासनास मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी तालुक्यातील मे. अॅक्टीव्हेन्टी्स प्रा. लि. या कंपनीची ऑगस्ट मध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी सदर कंपनीतून 52 लाख 59 हजार 102 रूपये किंमतीचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी सदर औषधांवर केरळ, उत्तराखंड, मेल्लोर, गढवाल अशी उत्पादकांची नावे होती. सदर कंपनीकडे पुन्हा या औषधांचा साठा आल्याची माहिती मिळताच औषध प्रशासनाने त्यातील औषधांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या औषधांमध्ये प्रतिजौविके औषधांमध्ये आवश्यक असलेली घटकद्रव्ये नसल्याचे सिध्द झाले. त्यानुसार औषध प्रशासनाने सदर कंपनीचा मीरा रोड येथील मेसर्स केभी जेनरिक हाऊस येथून सुमारे 95 लाख 92 हजार 138 रूपयांचा औषधांचा साठा जप्त केला. बनावट औषध विक्री केल्याबद्दल औषध प्रशासनाने सदर वितरकाच्या वरिोधा शांतीनगर (भिवंडी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ही पेढी बंद करण्यात आली आहे.
बनावट औषध विक्री प्रकरणी नारपोली येथील मे. अॅक्टीव्हेन्ट बायोटेक प्रा. लि. या कंपनीला 12 ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या कंपनीला 30 सप्टेंबर पर्यंत घाऊक औषध विक्रीस बंदी घालण्याचे आदेशही देण्यात आले होते. 12 डिसेंबर रोजी सदर कंपनीला औषध प्रशासनाचे निरीक्षक राजेश बनकर आणि शशीकांत यादव (गुप्तवार्ता विभाग, औषघ) यांनी पुढील तपास करून सुमारे 1 कोटी 1 लाख 76 हजार 126 रूपयांचा मुदतबाह्य औषधांचा जप्त केला आहे. ही कारवाई ओषध प्रशासनाचे सह आयुक्त (ठाणे) न. पु. सुपे, सहाय्यक आयुक्त प्रकाश महान्वर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी केली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पोलीस तपास सुरू असून संबंधितांवर आरोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे. सदर औषधांचे देशातील इतर राज्यात तसेच महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यात कनेक्शन आहे का याचाही तपास सुरू आहे.
न. पु. सुपे, सह आयुक्त, ठाणे