

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे जाळे बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी येथे एक उपजिल्हा रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र तर ९ उपकेंद्रांची नव्याने भर पडणार आहे. यापैकी उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य केंद्रांचे बांधकाम प्रगतीपथावर असून, आचारसंहिता शिथिल झाल्यांनतर उपकेंद्रांची कामे वेग घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
• दिवे अंजूर येथे प्राथ. आरोग्य केंद्र व १२ खोल्यांची कर्मचारी वसाहत इमारत
• आणगाव येथे माता व बाल रुग्णालय व १२ खोल्यांची कर्मचारी वसाहत इमारत
• मुरबाड, शिरोशी येथे १० खोल्यांची कर्मचारी वसाहत इमारत
• लोकसंख्येच्या आधारावर १० प्राथ. आरोग्य केंद्र आणि ५७ उपकेंद्र प्रस्तावित
ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात घेता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या कमी आहे. शासन आदेशानुसार गावापासून ६ किलोमीटर अंतरावर १ उपकेंद्र तर २५ किलोमीटर अंतरावर १ प्राथमिक आरोग्य केंद्र असावे असे निकष आहेत. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या २१ लाख एवढी आहे. जिल्ह्यात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर तालुक्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्र ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरवीत आहे.
या सोयींमध्ये आणखी भर म्हणून भिवंडी तालुक्यात २०० खाटांची सुविधा असलेले एक उपजिल्हा रुग्णालय व दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम सुरु आहे. यामध्ये दिवे अंजूर येथील आरोग्य केंद्र व आरोग्य कर्मचारी निवासी वसाहत तसेच आणगाव येथे माता व बाल आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासी वसाहतीचा समावेश आहे. मुरबाड तालुक्यातील शिरोशी येथेही कर्मचारी निवासी वसाहतीचे बांधकाम सुरु असून, या चारही इमारतीसाठी एकूण ७३ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी १० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५७ उपकेंद्र प्रस्तावित असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात १ उपजिल्हा रुग्णालय तर २ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम प्रगतीपथावर असून, त्याद्वारे आरोग्य सेवेचे जाळे बळकट करण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे