

भिवंडी : गेल्या काही महिन्यापासून शहरातील विविध भागात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि वाहतूक पोलीस विभाग यांना वारंवार सूचना करूनही उपायोजना होत नाही. तसेच विनापरवाना वाहनांवर देखील कारवाई करावी आदी मुद्दयांवर आमदार महेश चौघुले यांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत भिवंडीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकार्यांनी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करून विना कागदपत्रांच्या व्यवसाय करणार्या 25 रिक्षा जप्त केल्या आहेत.
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या निमित्ताने उपाययोजना करण्यासाठी शहरातील वाहतूक विभागाच्या कार्यालयात आमदार महेश चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. यावेळी भिवंडी शहरात येण्यासाठी व शहराबाहेर जाण्यासाठी अंजूरफाटा ते नदीनाका आणि कल्याणरोड ते साईबाबा बायपास हे दोन रहदारीचे प्रमुख मार्ग असून या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते.
ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश चौघुले यांनी वाहतूक विभागाला विविध सूचना करून कामात सुधारणा करून निर्णय घेण्यास सांगितले. तसेच उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या ठिकाणी अधिकचे कर्मचारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक वाहतूक अधिकार्यांना केल्या.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा तसेच स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करावे,असे सांगितले.या मीटिंगमध्ये घेतलेल्या उपाययोजनेचा आढावा 15 जानेवारीपर्यंत घेण्यात येणार असून त्यानंतर सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार महेश चौघुले यांनी दिला. यावेळी नदिनाका ते अंजूरफाटा आणि कल्याणरोड़ ते साईबाबा बायपास हे मार्ग अरुंद असल्याबाबतच्या विषयाबाबत आमदारांना विचारले असता आमदार चौघुले यांनी सांगितले कि, या मार्गावरील अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मनपा आयुक्तांना वारंवार सूचना करूनही त्यांनी नागरिकांच्या या समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.यानंतर शनिवारी रोजी भिवंडीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भिवंडीत दाखल झाले आणि त्यांनी जकातनाका,तीनबत्ती, वंजारपाटी नाका आणि एस. टी. स्थानक या ठिकाणी रिक्षांची सक्तीने तपासणी करीत विनाकागदपत्रे असलेल्या 25 रिक्षा जप्त केल्या आहेत. त्या एस. टी. स्थानकातील दुरुस्ती विभागाच्या जागेत ठेवल्या असून त्या रिक्षा स्क्रॅबमध्ये काढणार असल्याची माहिती सूत्राने दिली.त्यामुळे अवैध वाहन चालविणार्या चालक आणि मालकांमध्ये घबराट पसरली आहे.
या बैठकीत ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, भिवंडी वाहतूक विभागाचे सहा.पोलीस आयुक्त शरद ओहोळ, पोलीस निरीक्षक सुधाकर खोत, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाजसेवक अशोक जैन आणि माजी नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्यासह भिवंडीकर नागरिक उपस्थित होते.