

ठाणे : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरटीई (25 टक्के) प्रवेशासाठी राज्यस्तरावर लॉटरी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातील एकूण 10 हजार 578 बालकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून, पालकांनी विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ठढए झेीींरश्र चरहरीरीहीींर या संकेतस्थळावर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ऍडमिट कार्डची प्रिंट, ऑनलाईन अर्जाची प्रत, तसेच हमीपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत घेऊन संबंधित तालुका किंवा महानगरपालिका पडताळणी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेणे अनिवार्य असून, त्यानंतर संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दरम्यान, पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती मिळणार असली तरी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील “अर्जाची स्थिती” या टॅबवर जाऊन अर्ज क्रमांक टाकून निवडीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना क्रमाने द्वारे माहिती दिली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुका किंवा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.