

ठाणे : न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये सोमवार (दि.16) रोजी कसऱ्यात बंद पाळण्याचे आवाहन आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. बंद दरम्यान निषेध, धरणे आंदोलन करण्यात् आले आहे.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना मंगळवार (दि.10) रोजी घडली. या घटनेचा निषेध म्हणून बुधवार (दि.11) बंद पुकारण्यात आला. या दरम्यान दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. सदर प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. काहींना ताब्यात घेण्यात आले. यातीलच एकाचा न्यायालयीन कोठडीत असतांना रविवार (दि.15) रोजी मृत्यू झाला. सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी असे मयताचे नाव आहे.
या घटनेचा निषेध करत तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. कसारा बाजारपेठ बंद करीत आर.पी.आय.चे पदाधिकारी सुहास जगताप.रवींद्र शेजवळ,,राजू उबाळे,संतोष कर्डक, राहुल शेजवळ, सरपंच प्रकाश वीर, गणेश भरीत, नारायण पेढेकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रविवारी (दि.15) सायंकाळी समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत सोमवारी (दि.16) कसारा बंद शांततेत पाळण्यात आला.
बंद दरम्यान आर.पी.आय.च्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. कसारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून चौकात् निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर कसारा पोलीस ठाण्यावर मोर्चा वळवण्यात आला. कसारा पोलीस ठाण्यासमोर घटनेचा निषेध व्यक्त करत भीम अनुयायी यांनी सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान न्यायालयीन कोठडीत मयत झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांना आंबेडकरी अनुयायांनी श्रध्दांजली अर्पण केली. दरम्यान या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस.स्वामी, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेश गावीत यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बंद ला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.