

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे प्रथम सभापती स्व. चंद्रकांत भोईर यांनी साकारलेल्या कल्याण येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाचे नुतनीकरण महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले. या चौकाचे नुतनीकरण केल्यानंतर बुधवारी (दि.12) संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
कल्याण पश्चिमेत होटेल गुरूदेवच्या शेजारी असलेल्या चौकात महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे प्रथम सभापती स्व. चंद्रकांत भोईर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज चौकाची संकल्पना मांडून या चौकाचे नामकरण केले होते. त्यानंतर या चौकात प्रत्येक वर्षी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात येत असे. चर्मकार समाजाने नंतर पुढाकार घेऊन चौकाचे नुतनीकरण करण्यासाठी महानगरपालिकेचे समाज कल्याण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार चौकाचे नुतनीकरण करण्यात आले.
बुधवारी (दि.12) या चौकात संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. ज्यांच्या संकल्पनेतून चौक बांधला गेला त्या स्व. चंद्रकांत भोईर यांचे सुपुत्र रूपेश भोईर यांनी श्रीफळ वाढवून नूतनीकरण झालेल्या चौकाचे उद्घाटन केले. या प्रसंगी कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, बाळा परब, रवी पाटील, अरविंद मोरे, समृद्ध ताडमारे, निलेश भोर, संत रोहिदास ज्ञाती समाजाचे अध्यक्ष महेश भोईर यांच्यासह चर्मकार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.