

भिवंडी : भिवंडी शहरात जुलै मध्ये सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेल विभागास तक्रारदार महिलांकडून प्रतिसाद मिळत असून अवघ्या सहा महिन्यात या ठिकाणी १७३ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ९१ अर्जदार व विरोधक या दोन्ही कडून या कार्यालयात समुदेशकां समोर हजेरी लावली. त्यामध्ये ३५ अर्जावर समुपदेशकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा चांगलं परिणाम होत त्यांच्यात समेट घडवून आणला आहे
भरोसा सेल अर्थातच महिलांच्या कौटुंबिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस यंत्रणे कडून उभी केलेली एक व्यवस्था. प्रत्येक कौटुंबिक तक्रार थेट पोलिस ठाण्यात दाखल करून न घेता सर्वप्रथम महिला समुपदेशक केंद्रा समोर तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये चर्चा घडवून पती-पत्नीमध्ये समझोता समेट घडून आला तर त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा स्थिरस्थावर होऊ शकतं आणि याच भूमिकेतून अशा कौटुंबिक तक्रारी, हुंड्या साठी मानसिक शारीरिक छळ या प्रकरणीच्या तक्रारी भरोसा सेल मध्ये पाठवून तेथे झालेल्या समुपदेशाने अनेक कुटुंब सावरली आहेत. भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालया समोर यापूर्वी सुरू असलेले महिला समुपदेशन केंद्र मागील पाच वर्षांपासून बंद होते. त्यामुळे शहरातील तक्रारदार महिलांना थेट ठाणे पोलिस आयुक्त कार्यालय गाठावे लागत होते. त्यामुळे आधीच पिचलेल्या महिला तक्रार करण्याचे टाळतात. या बाबत अनेक महिला संघटनांकडून मागणी झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या मागणीस सकारात्मकता दर्शविली. १ जुलै रोजी पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या नव्या भव्य इमारती मध्ये भरोसा सेल सुरू केला आहे.
सध्या आठवड्यातील समुपदेशनाचे या ठिकाणी पाच दिवस काम सुरू असते. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. सोमवार व शुक्रवारी श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंह, मंगळवारी स्नेहा संस्था तर गुरुवार, बुधवार या दिवशी डॉ अद्वैत त्रिमुखे हे मानसोपचारतज्ञ समुपदेशन करण्यासाठी येत असतात. या भरोसा सेल मध्ये सहा महिन्यात या ठिकाणी १७३ अर्ज दाखल झाले असून त्यातील ९१ अर्जावर समुदेशन झाले. त्यातील ३५ कौटुंबिक अर्जावर समाधानकारक यश मिळाले असून पती पत्नी यांच्यात समेट घडून आला आहे. तर समाधान न झालेल्या तक्रारदार महिलांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या तर काही तक्रारदारांनी न्यायालयाची पायरी चढली आहे. बऱ्याच वेळा समोरची बाजू मांडणारे या ठिकाणी येण्याचे टाळतात त्यातून वाद विकोपाला जातो. परंतु भरोसा सेल समोर पती पत्नी हे दोघे ही आल्या वर दोन्ही बाजू ऐकून घेत गैरसमज दूर करीत दोघांना समजावले तर दोघे ही समजून घेतात अशी प्रतिक्रिया श्री साई सेवा संस्थेच्या समुपदेशक डॉ स्वाती सिंह यांनी दिली आहे.