

डोंबिवली : वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्रगुरू लहुजी वस्ताद साळवे या दोन्ही क्रांतिवीरांची पुण्यतिथी 17 फेब्रुवारी या दिवशी येते. भारतीय इतिहास संकलन समिती-कल्याण जिल्हा, कचोरे गावातील श्रीरामसेवा मंडळ, हुतात्मा स्मारक मंडळ, क्रीडाभारती, आदी संस्थांनी सालाबादप्रमाणे याही दिवशी सोमवारी (दि.17) रोजी सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीच्या श्री गणपती मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा पूर्वांचल विकास परिषदचे कार्यकर्ते शिरीष आपटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना क्रांतिवीरांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक माजी नगरसेविका तथा भाजपाच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, तर प्रमुख वक्ते म्हणून डोंबिवलीच्या श्री गणपती मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा पूर्वांचल विकास परिषदचे कार्यकर्ते शिरीष आपटे उपस्थित होते.
गेली अडीच दशके इतिहास संकलन समितीच्या कल्याण जिल्हा आणि विविध संस्था 17 फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्रगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करत आले आहेत. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून का म्हटले जाते, याचे विवेचन प्रमुख वक्ते शिरीष आपटे यांनी केले. त्याचबरोबर क्रांतिकारक फडके यांच्याबाबत माहिती अतिशय रोचक शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडली. वासुदेवराव फडके यांनी ब्रिटीश सत्तेला भारतातून हाकलून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीस सुरूवात केली. त्यातूनच पुढे प्रेरणा घेऊन चापेकर बंधूंपासून स्वा. वि. दा. सावरकर अशा अनेक युवकांनी सशस्त्र क्रांतीचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा चालू ठेवला. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी आनंद मठ कादंबरी वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून लिहिली. 1879 ते 1883 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत जो संघर्ष केला त्या काळात काही काळ वासुदेव बळवंत फडके कल्याण-डोंबिवलीच्या सीमेवर असलेल्या नेतिवली टेकडीवरील गुहेत राहिले होते. त्या काळात कचोरेगांव आणि परिसरातील आगरी-कोळी बांधवांनी या क्रांतिकारकांना भाकऱ्या पुरवल्या होत्या असे सांगितले. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेतलेले वासुदेवराव आपल्या भिल्ल आणि रामोशी सहकाऱ्यांना सतत छत्रपती शिवरायांची आठवण करून देत असत. त्यांच्या नीतीप्रमाणेच आपल्याला चालायचे असल्याचे आग्रहाने सांगत असत. वासुदेव बळवंत फडके यांचे शस्त्रगुरू ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॉलेजचे विद्यार्थी असताना त्यांनाही घोडेस्वारी, बंदूक चालवणे, तिरंदाजी, तलवारबाजी, इत्यादी शिक्षण दिले होते. त्यांचीही पुण्यतिथी 17 फेब्रुवारीलाच असते. त्यांच्या देशभक्तीचे वर्णन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रेखा चौधरी यांनी नेतीवलीवरील गुहेचे वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मरणार्थ सदर स्थान सुशोभित करावे आणि पुढील पिढीसाठी क्रांतीकारकांचा आदर्श जतन करावा असे म्हटले, तसा ठरावही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पारित केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली फणसे यांनी केले. तर विद्यार्थ्यांच्या एका गटासमोर वासुदेवराव कोल्हटकर यांनी क्रांतिवीर वासुदेव फडके यांचे चरित्र मांडले. सदर कार्यक्रमाला तीन शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गुहेत जाऊन लहुजी साळवे आणि वासुदेवराव फडके यांच्या प्रतिमांचे पुष्प वाहून पूजन केले.
ब्लॉसम स्कूल, कोरा कोतकर विद्यालय आणि गुरूकुल या शाळांचे मिळून जवळपास शंभर विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. को. रा. कोतकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पाखले यांच्यासह ब्लॉसम विद्यालय आणि गुरूकुलच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचा राजन चौधरी यांच्या श्रीराम सेवा मंडळातर्फे अध्यक्षांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय इतिहास संकलन समितीचे कोकण प्रांत सचिव चंद्रकांत जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुतात्मा स्मारक प्रतिष्ठानचे गं. कृ. पुरंदरे, क्रीडा भारतीचे सर्वश्री पंकज येवले, इतिहास संकलन समितीचे प्रशांत रावदेव, प्रशांत शिरूडे, विनोद बेंद्रे आणि श्रीराम समर्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांसह टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हे कर्मचारी गुहेच्या संरक्षणासाठी देखील जबाबदारीने लक्ष ठेवून असतात.