Kalyan-Dombivli Red Alert : सावधान! कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टीचा इशारा, सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Thane Heavy Rain Alert : विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी
Kalyan-Dombivli Red Alert : सावधान! कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टीचा इशारा, सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Pudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या तसेच शैक्षणिक वर्तुळातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, उद्या शनिवारी म्हणजेच ४ जुलै रोजी केडीएमसी क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' आणि प्रशासनाचा निर्णय

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे. हवामान खात्याने २ आणि ३ जुलै या कालावधीसाठी शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तर उद्या शनिवारी ४ जुलै रोजी थेट 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अत्यंत गंभीर अशा रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तातडीने सुट्टी देण्याचा हा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी

या कालावधीत शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह अनेक सखल भागांत पाणी साचण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन स्थानिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात ये-जा करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणाच्याही सुरक्षिततेला बाधा पोहचू नये, यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह सर्व महाविद्यालये शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.

या सुट्टीच्या कक्षेत राज्य मंडळ (State Board), सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE), आणि सीआयई (CIE) या सर्व बोर्डांच्या शाळांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रातील सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं-अर्थसहाय्यित अशा सर्वच प्रकारच्या शैक्षणिक संस्थांना हा आदेश पाळणे बंधनकारक राहील.

शाळा व्यवस्थापनाला दक्षता घेण्याच्या सूचना

केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या विशेष मान्यतेने शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी शुक्रवारी हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरी करून अधिकृतपणे जारी केले. या परिपत्रकात केवळ उद्याच्या सुट्टीचा उल्लेख नसून, शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला पुढील काळासाठीही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी काळातही स्थानिक परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस कोणताही धोका निर्माण होणार नाही अशाच प्रकारे योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व शाळांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news