बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी महापौर, तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सख्खे आत्येभाऊ राजीव पाटील उर्फ नाना अगदी उद्याही किंवा कोणत्याही क्षणी भाजपात दाखल होणार असल्याच्या वृत्तास भक्कम पुष्टी मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आठवडाभर होत होती. अशा चर्चा पाच वर्षांपूर्वीही झाल्या होत्या. यावेळी वसई विरार शहरात राजीव पाटील यांचे बहुजन विकास आघाडी पक्षाचे नाव वगळलेले, तथा त्यांच्या केवळ कामगार संघटनांची ओळख सांगणारे नवरात्रोत्सव शुभेच्छांचे फलक झळकळ्याने या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली होती.
बहुजन विकास आघाडीच्या बॅनर वरील नेतेमंडळीतून राजीव पाटील यांचा फोटो हटविण्यात आल्यामुळे खुद्द बविआकडूनच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे.
दि. 13 ऑक्टोबर, रविवारी नालासोपारा पश्चिमेला खुल्या रंगमंचाच्या उद्घाटनाचा मोठा पक्षीय सोहळा होत असून, त्याचे आज सर्वत्र बॅनर लागले आहे. या बॅनरवर बविआ नेत्यांच्या पहिल्या आणि अगदी दुसर्या फळीतील नेत्यांचेही फोटो असून, मात्र त्यातून पाटील यांचा फोटो वगळलेला आहे. ही बाब पाटील यांचा ठाम निश्चय आणि बविआकडूनही परतीचे दोर कापल्याचा संकेत देणारी मानली जात आहे. अतिशय प्रतिकूल काळातून 35 वर्षांच्या संघर्षाचा लढा देत, विरारच्या ठाकूर साम्राज्याचा दबदबा राज्यात निर्माण करण्यात आणि राजकीय पक्ष म्हणून बविआचा विस्तार करण्यातही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबरीने योगदान देणारे नेते म्हणून राजीव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून, ठाकूर व पाटील कुटुंबीयातील अखंडतेलाही तढा जाणार आहे.
राजीव पाटील यांची विधानसभा निवडणुक लढविण्याची खूप आधीपासून इच्छा होती. वसई विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे दुसर्या क्रमांकाचे नेते मानले जातात. वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर, कामगार नेते वसईतील अग्रेसर बांधकाम व्यवसायीक म्हणून ते ओळखले जातात. पाटील यांचे संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि
वसई विरार शहरातही स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य आहे. 2009 मध्ये महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यांना प्रथम महापौर पदाची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांना कोणतेही मोठे पद मिळाले नाही. मात्र 2014 मध्ये मतदारसंघाच्या पुर्नरचनेननंतर नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची इच्छा होती. परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन जिंकवून आणले. क्षितीज ठाकूर 2009 पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांनी आमदारकी लढविण्याची तयारी केली आहे. राजीव पाटील यांचे वय 65 वर्ष आहे. ही संधी गेली तर पुढील 5 वर्षानंतर वयाच्या सत्तरीनंतर सर्वसाधारणपणे निवडणूक लढविण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांनी व कार्यकर्त्यांनी अभी नही तो कभी नहीचा नारा देत, आगामी विधानसभा निवडणूक लढवायचा निर्धार केल्याचे बोलले जाते.