

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये रस्त्यांचे बांधकाम करताना नियोजन पूर्णतः फसल्याचे शनिवार (दि.14) रात्री जोरदार पावसाने केलेल्या बॅटींगमुळे स्पष्ट झाले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारे व नाल्यांच्या कामात केलेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका या भागातील रहिवाशांना बसत आहे.
सांडपाणी मिश्रित पाणी इमारतींच्या आवारात घुसल्यामुळे एकीकडे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, तर दुसरीकडे याच सांडपाण्याच्या प्रादुर्भावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी एमआयडीसीसह केडीएमसीकडे तक्रारी करून कुणीही लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी (दि.14) सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत एमआयडीसी परिसरात जोरदार पाऊस पडला. निवासी विभागातील आर एच - ११० संदेश सोसायटीसह आसपासच्या इमारतींमधील आवारात गुडघाभर पाणी साचले. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. जर पाऊस रात्रभर सुरू राहिला असता तर हेच सांडपाणी तळमजल्यावरील घरांमध्ये शिरले असते. पावसाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे.
अजून तीन - चार महिने पाऊस पडणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात कधीनाकधी घरात सांडपाणी शिरण्याची शक्यता आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाने यांनी या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी,
विनिता सावंत, संदेश सोसायटीतील त्रस्त रहिवाशी
एमआयडीसीतील भूमिगत सांडपाणी वाहिन्या अनेक ठिकाणी तुंबल्या आहेत, तर त्यावरील चेंबर्स देखिल फुटले आहेत त्यामुळे त्यातील सांडपाणी उघड्यावर ओसंडून वाहत असते. सांडपाणी वाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम एमआयडीसीकडे आहे. तसेच गटारे व नाल्यांची साफसफाई नीट झालेली नाही. गटारे व नाल्यांच्या साफसफाईचे काम केडीएमसीकडे आहे. पावसामुळे नाले आणि गटारातील हेच सांडपाणी इमारतींच्या आवारात येत आहे. या संदर्भात रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर एमआयडीसी आणि केडीएमसीचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करत असतात. परिणामी पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रशासनांनी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.