

ठाणे : आगामी गौरी - गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा, यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. या सेवेचा शुभारंभ आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला असून या आरक्षण खिडक्या ११ ते ३१ जुलै दरम्यान कार्यान्वित राहणार आहेत.
गतवर्षी प्रमाणे यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त खिडक्या सुरु झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावर ३ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. ट्रेन नंबर 12133 - मंगलोर एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12431 - राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12201 - गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात ठाणे स्थानकात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत ‘मायक्रोटेनल' चे काम पूर्ण झाले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानक परिसरात कुठेही पाणी साचलेले नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर नवीन एस्केलेटरचे (सरकते जिने) काम सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. तसेच, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील सार्वजनिक प्रसाधनगृहांचे नूतनीकरणाचे काम वेगाने सुरु आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली.
यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुशांत मिश्रा, अपर्णा देवधर, मिलिंद शिंदे, शशांक सरतूर, रणजीत सिंह , प्रमिला देवगण, लुसी कुजूर, रेल्वे कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी मानसी जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, विलास जोशी, माजी नगरसेवक भास्कर पाटील, बाळा गवस, जगदीश थोरात, किरण नाकती आदी यावेळी उपस्थित होते.