डोंबिवली : ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी (दि.5) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत-कसार्याच्या दिशेने जाणारी वाहतूक यामुळे तब्बल एक तासापासून ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने स्फोटासारखा आवाज झाला आणि लोकल जागच्या जागी थांबल्या.
दरम्यान ठाणे रेल्वे स्थनाकरात सायंकराळी प्रचंड गर्दी झाली. बदलापूर, कल्याण, कसाराकडे जाण्यासाठी असलेल्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन तरुणी जखमी झाल्या. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखले केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने या लोकलमधील प्रवासी भयभीत झाले होते. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ लोकल स्लो होताच घाबरलेल्या प्रवाशांनी चालू लोकलमधून उड्या मारत खाली उतरून स्थानक गाठले. काही वेळात दुरूस्तीचे काम पूर्ण होऊन विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर झाल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले.
ठाकुर्ली स्थानकाजवळ तुटलेल्या ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक विभागाने सुरू केले. दुरूस्तीनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी कर्जत आणि कसार्याच्या दिशेने जाणार्या लोकल जागीच थांबल्या होत्या. ठाकुर्ली स्थानकाजवळ असलेल्या इमारतीत राहणार्या एका जागरूक रहिवाशाने ठाकुर्ली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटलेल्या लोकलचे फोटो वजा व्हिडियो टिपून समाजमध्यमांवर व्हायरल केले.
बदलापूर लोकलमधील प्रवासी, त्याच्या पाठोपाठ खोळंबलेल्या लोकलमधील गर्दी एकाचवेळी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात झाली. त्यामुळे हे स्थानक गर्दीने तुंडूब भरले होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेत होते. रेल्वे मार्गातून पायी चालत येणार्या प्रवाशांना जवान सुरक्षितपणे स्थानकाकडे येण्याच्या सूचना करत होते. ठाकुर्लीजवळ लोकल बंद पडल्याची माहिती मिळताच डोंबिवली आणि ठाकुर्ली भागातील रिक्षावाल्यांची चंगळ झाली. ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात रिक्षा नेऊन प्रवाशांना आवश्यक ते भाडे घेऊन कल्याण, डोंबिवली परिसरात पोहोचवले. 90 फुटी रस्त्यावरून कल्याणकडे जाणार्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. दरम्यान मागील काही दिवसांपासून ठाकुर्ली जवळ लोकल आणि एक्सप्रेस इंजिन बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
दुपारी पावणे तीनची वेळ असल्याने लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. ठाकुर्ली रेल्वे स्थानकापासून कचोरे गावदेवी मंदिरादरम्यान लोकल बंद पडल्याने प्रवाशांनी चालत ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. तर काही प्रवाशांनी 90 फुटी रस्त्यावर जाऊन तेथून रिक्षाने कल्याण गाठले. कल्याणकडे जाणार्या धिम्या मार्गात बदलापूर लोकल ओव्हरहेड तुटल्याने खोळंबून राहिली होती. त्यामुळे या लोकलच्या पाठोपाठ धावणार्या कल्याणकडे जाणार्या कल्याण, टिटवाळा, कसारा, कसारा, अंबरनाथ, कर्जत, खोपोली लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा भागात जागोजागी खोळंबून राहिल्या. दिवा परिसरात कर्जतकडे जाणार्या एक्सप्रेस खोळंबून राहिल्या.
ओव्हरहेड वायर तुटताना मोठा आवाज आणि परिसरात धूर पसरला. केबल जळल्याचा वास सुटल्याने प्रवाशांना सुरूवातीला लोकलला आग लागल्याची अफवा उठली. त्यामुळे प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. बदलापूर लोकलच्या ठाकुर्ली दिशेकडील तिसर्या डब्याजवळील ओव्हरहेड वायर तुटली. मागील काही दिवसांपासून ठाकुर्ली जवळ लोकल आणि एक्सप्रेस इंजिन बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.