

डोंबिवली : पूल उभारणीच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच संभाव्य अपघात वा दुर्घटना घडू नये, याकरिता डोंबिवली रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडे असलेल्या फलाट क्रमांक 1/ए वरील सरकता जिना आणि स्कायवाॅकची उतार पायवाट प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवार (दि.6) पासून बंंद केली आहे. प्रवाशांनी या बंद सरकत्या जिन्या किंवा पायवाटेऐवजी उत्तर बाजूकडील सरकते जिने वा उतार पायवाटेचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचपर्यंत पादचारी पूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. एप्रिल ते मे दरम्यान ही कामे सुरू करण्यात आली होती. परंतु पावसाळा सुरू झाल्याने पादचारी पुलाचे काम करताना आणि फलाटावरील प्रवाशांना या कामामुळे येणे-जाणे अवघड होत असे. त्यामुळे अपघात/दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे काम चार महिने बंद ठेवले होते. आता हेच काम नव्या जोमाने सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या पादचारी पुलाच्या मार्गातील पश्चिमेकडील तिकीट खिडकी आणि तिकीट आरक्षण केंद्र फलाटाच्या दुसऱ्या भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. या कामात फलाट क्रमांक 1/ए वरील सरकता जिना आणि स्कायवाॅकला जोडून असलेली उतार पायवाट अडथळा ठरत होती. त्यामुळे पुलाच्या कामासाठी हे दोन्ही प्रवासी मार्ग रेल्वे प्रशासनाने बुधवारी 6 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. फलाट क्रमांक 1/एवर उतरणाऱ्या प्रवाशांनी दिव्याच्या दिशेकडील जिन्यावरून न जाता उत्तर दिशेकडे असलेल्या जिना किंवा स्कायवाॅकने इच्छित स्थळी जावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सरकता जिना आणि उतार पायवाटेवरून प्रवासी पश्चिम रेल्वे स्थानकात भागात ये-जा करत असत. फलाट क्रमांक 1/एच्या दुतर्फा सरकते जिने आणि उतार वाट असल्याने गर्दीचे विभाजन होत असे. फलाट 1/एवर आता प्रवाशांना एकच मार्गिका येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असल्याने या भागात गर्दी वा चेंगराचेंगरा होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने सकाळ-संध्याकाळ फलाट क्रमांक 1/एवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने येत्या पावसाळ्यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.