

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात एका तरुणीला आपला हात कायमचा गमवावा लागला. सीमा शब्बीर शेख (वय 28, रा. रा. रोटीमंगर, कछवामो) असे त्या तरुणीचे नाव आहे.
हा अपघात सोमवारी रात्री 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडला. महानगरी एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र 7 वर आली. तेव्हा सीमा शेख या उतरत असताना त्यांचा पाय घसरला. त्यामुळे रेल्वेच्या रुळावर पडल्या. यामध्ये रेल्वेच्या चाकाखाली पडल्याने त्यांचा उजवा हात हा शरीरापासून वेगळा झाला. त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शेख यांचा जीव वाचला; मात्र कायमचे अपंगत्व आलेले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिचा मोबाईल आणि वस्तू तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.