

ठाणे : ठाण्याच्या राबोडी परिसरातील साकेत येथील राबोडी वाहतूक पोलीस चौकीजवळ असलेल्या परिसरात भंगार पडलेल्या 7 ते 8 वाहनांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
सदरची घटना बुधवारी दुपारी 1-45 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे राबोडी परिसरातील साकेत रोडवरील भंगारामध्ये असलेल्या गाड्यांना आग लागल्याची माहिती दक्ष नागरिक सूर्यकांत सुर्वे यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर काही मिनिटांत आग आटोक्यात आली. दरम्यान या घटनेत मोठ्या प्रमाणात त्या परिसरात धूर झाला होता.