![संजय सखाराम भोईर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-1-8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: जागा-जमिनीचे व्यवहार वजा व्यवसाय करणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचा मृतदेह डोंबिवलीजवळच्या उंबर्ली गाव परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय सखाराम भोईर ( वय 43) असे या प्रॉपर्टी ब्रोकरचे नाव असून त्यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. भोईर यांची हत्या का व कुणी केली याचा तपास मानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँच करत आहेत.
स्कूटरवरून परतताना काढला काटा
भोईर यांची हत्या धारदार शास्त्राने केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संजय भोईर हे स्कूटरने घरी परतत होते. मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर गाठून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात भोईर जबर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. घरच्यांनी उचलून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली ? याचा चौकस तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तपास चक्रांना वेग दिला आहे.