

ठाणे : शहरात लागू असलेल्या १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच खासगी टँकरचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून १० हजार लिटर पाणी सुमारे ७०० रुपयांना उपलब्ध होत असताना नागरिकांकडून त्याच पाण्यासाठी तब्बल ३५०० रुपये उकळले जात आहेत. काही ठिकाणी टँकरसाठी आठ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
या मनमानीला आळा घालण्यासाठी खासगी टँकरचे दर निश्चित करून अधिकृत दरपत्रक जाहीर करावे, टँकरची ऑनलाइन नोंदणी आणि GPS ट्रॅकिंग बंधनकारक करावे, अशी मागणी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.
पाणीकपातीमुळे घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील अनेक सोसायट्यांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, टँकर वेळेवर मिळत नसल्याने आणि क्षमतेनुसार दरांमध्ये मोठी तफावत असल्याने नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या नियोजनासह शहरातील अन्य नागरी प्रश्नांवर चर्चा केली.
खासगी टँकरची अधिकृत नोंदणी करून त्यांच्या क्षमतेनुसार दर निश्चित करावेत. हे दर महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि प्रभाग कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावेत. मुंबईसह अन्य भागांतून ठाण्यात येणाऱ्या टँकरचीही नोंद ठेवून पाण्याचा स्रोत तपासावा. नागरिकांना टँकर मागविण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. नोंदणीकृत टँकरना GPS यंत्रणा बसवून त्यांचे लोकेशन आणि पाणी वितरणावर नियंत्रण ठेवावे. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांना नियमित पाणीपुरवठा, टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यायी जलस्रोतांचा वापर करा
महापालिकेने स्वच्छ केलेल्या विहिरी आणि उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. या माध्यमातून दररोज किती पाणी उपलब्ध होते आणि त्याचा किती नागरिकांना लाभ मिळतो, याची माहिती सार्वजनिक करावी. प्रत्येक विभागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांतील समस्या सोडवाव्यात. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी करून पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचविले.
पारसिक चौपाटीचा विकास आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
कळवा येथील पारसिक चौपाटीची रखडलेली विकासकामे पूर्ण करून स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षेची व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमून दुचाकींचा वॉकिंग ट्रॅकवरील प्रवेश रोखावा. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानके, बस थांबे, बाजारपेठा आणि महाविद्यालय परिसरातील अंधाऱ्या ठिकाणी पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त पाहणी करून असुरक्षित ठिकाणांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डावखरे यांनी केली.