
बदलापूर (ठाणे) : पंकज साताळकर
बदलापूर पूर्व परिसरात शुक्रवार पासून (दि.4) ते रविवारी (दि.6) सकाळपर्यंत सलग तीन दिवस, दररोज १२ ते १८ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शुक्रवारी (दि.4) शिवसेना तर त्यापूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर संतप्त मोर्चा काढला. यावेळी महावितरण अभियंत्याकडून “वीजपुरवठा दोन‑चार दिवसांत सुरळीत करू” असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात, शुक्रवारी (दि.4) सकाळी १० वाजता देखभाल‑दुरुस्तीच्या नावाखाली वीज बंद केल्यानंतर ती रात्री १० वाजेपर्यंतच सुरु होती. शनिवारीही (दि.5) रोजी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनियमित वीजपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर रविवार (दि.6) पहाटेच वीजपुरवठा काहीसा स्थिरावला.
वारंवार होत असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. “तांत्रिक दोष दूर करण्यासाठी १८‑१८ तास लागतात आणि तरीही वीज दर अर्ध्या‑तासाला बंद होते, तर महावितरणची सेवा आम्हाला नको,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त केली. काही नेटिझन्सनी “येथील अधिकाऱ्यांच्या इंजिनिअरिंग पदव्या खऱ्या आहेत का?” असा सवालही यावेळी उपस्थित केला.
लोकप्रतिनिधींच्या तक्रारीही महावितरण अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, प्रलंबित त्रुटी तत्काळ न सोडवल्यास बदलापुरात रहिवाशांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहे. महावितरणकडून मात्र कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नसल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे.