Thane Politics : भाजप सत्तेत तरीही निभावणार चौकीदाराची भूमिका, भाजप आमदार केळकरांचा शिवसेनेला इशारा

निवडणुकीत ठाणेकरांसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज करण्यासाठी कटिबद्ध
Thane Politics : भाजप सत्तेत तरीही निभावणार चौकीदाराची भूमिका, भाजप आमदार केळकरांचा शिवसेनेला इशारा
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेत भाजप सत्तेत असूनही ठाणेकरांच्या कल्याणासाठी, शहराच्या पारदर्शी विकासासाठी जनतेचा चौकीदार म्हणून भूमिका निभावणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. हा सत्ताधारी शिवसेनेला इशारा असून त्याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी ठाणे महापालिकेत झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौरपदी बिनविरोध निवडून आले. यावेळी उपस्थित असलेले आमदार संजय केळकर यांनी भाजपची महापालिकेतील परखड भूमिका स्पष्ट केली. महायुती म्हणून सत्तेत सहभागी होऊन पद वाटपाचा निर्णय राज्य पातळीवर श्रेष्ठींनी घेतला आहे. इतर महापालिकांप्रमाणे ठाणे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र इतर पद वाटपात भाजपचा सन्मान राखला जावा अशी आमची भूमिका असेल, असे केळकर यांनी सांगितले.

निवडणुकीत ठाणेकरांसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरात पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेने विकास करण्याचे आश्वासन आम्ही ठाणेकरांना दिले आहे. चांगल्या योजनांना पाठिंबा देताना कुठे चुकीचे काम होत असेल तर त्याला नक्कीच विरोध करून ते थांबवू. ठाणेकरांना जे जे अडचणीचे आहे ते ते अडथळे दूर करू. शहरात १०० फेरीवाल्यांचे हजार फेरीवाले झाले आहेत. त्यांनी रस्ते, पदपथ व्यापले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. फेरीवाला धोरण का झालेले नाही? अनधिकृत बांधकामांपासून चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला असेल, त्यावर परखड भूमिका मी निश्चितपणे घेणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.

पारदर्शी शहर विकास, महापालिकेचा कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि योजना यासाठी ठाणेकरांनी सत्ता दिली आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांचा चौकीदार म्हणून महापालिकेच्या कारभारावर आणि चुकीच्या कामांवर करडी नजर ठेवणार असल्याचेही केळकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news