ठाणे : सणासुदीच्या दिवसांत शांततेसाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

जमावबंदीचे आदेश : हैदोस घालणारी मंडळी कल्याण-डोंबिवलीतून परागंदा
डोंबिवली, ठाणे
पोलिसांच्या शक्ती प्रदर्शनामुळे गुंड, मवाली, समाजकंटक गुन्हेगारांना चांगलाच वचक बसला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : आगामी गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती यासारख्या सण व उत्सवांना कुठेही गालबोट लागून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त डॉ. अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.26) रोजी शक्तिप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पोलिसांच्या शक्ती प्रदर्शनामुळे गुंड, मवाली, समाजकंटक गुन्हेगारांना चांगलाच वचक बसला आहे. अनेक बदमाश कल्याण-डोंबिवली सोडून परागंदा झाले आहेत.

सण व उत्सवांच्या काळात सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यासह सामाजिक वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय राहण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार डीसीपी अतुल झेंडे यांनी परिमंडळातील आठही पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना तशा सूचना दिल्या आहेत. एकीकडे पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावगुंड, समाजकंटक तथा सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर उचित कारवाई करण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे, तर दुसरीकडे खासगी वा सार्वजनिक ठिकाणी उपद्व्याप करणाऱ्या बदमाशांच्या उरात धडकी भरावी या हेतूने पोलिसांनी रूट मार्चचे आयोजन केले होते.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहजानंद चौक, काळी मशीद या ठिकाणाहून हा रूट मार्च सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करून पुढे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय-शंकरराव चौक-आचार्य अत्रे नाट्यगृह-घेला देवजी चौक-गांधी चौक- दूध नाका-पारनाका-लालचौकी-दुर्गामाता चौक-दुर्गाडी मंदिर-वाय जंक्शन येथे यु टर्न घेऊन दुर्गाडी मंदिराजवळ विसर्जित करण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह महात्मा फुले चौक, खडकपाडा व बाजारपेठ पोलिस ठाण्यातील 5 पोलिस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक 77, तसेच एसआरपीएफचे 1 अधिकाऱ्यासह 11 अंमलदार. 3 पिटर मोबाईल, 1 सीआरएम मोबाईल सहभागी झाले होते.

ठाणे
पोलिसांनी परिसरात रूट मार्च केला.Pudhari News Network

सामाजिक कार्यकर्त्यांची शांततेला साथ

अग्रभागी पोलिसांची वाहने आणि वरिष्ठ अधिकारी रूट मार्चचे नेतृत्व करत होते. अचानकपणे रस्त्यावर उतरलेला सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा बघून पादचाऱ्यांना मोबाइलद्वारे क्लिक करण्याचा मोह आवरता येत नव्हता. याच रूट मार्चचा संवेदनशील परिसरावर निश्चित परिणाम होत असतो. या परिसरात सण व उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते परिसरातील वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय राहण्याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news