

Thane Police keep a close eye on waterfalls and monsoon tourist spots
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
ठाणे जिल्ह्यात अनेक पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. पावसाळा सुरू होताच या पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागते. गेल्या आठवडाभराच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे वाह लागले असून पावसाळी पर्यटनस्थळ बहरू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने देखील सुरक्षेची पावले उचलली आहेत.
मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना यंदा पोलीस रोखणार आहेत. त्यासाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक तयार करून पर्यटनस्थळी पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मद्यपी व हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पर्यटनस्थळी नाकाबंदी केली जाणार असून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक धबधब्यांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
एकीकडे पसरलेला डोंगराळ अन जंगलाने नटलेला परिसर तर दुसरीकडे अत्यंत मोठ्या प्रमाणात विकसित झालेला शहरी भाग अशा दुहेरी संगमाने नटलेला ठाणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर अशी उपनगरे स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जातात. तेथेच या जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आजही प्राकृतिकदृष्ट्या बहरलेली आहेत. एकट्या ठाणे शहरात तिसहून अधिक संख्येने तलाव आहेत.
तसेच येऊर धबधबे, कळवा मुंब्रा रेती बंदर, मुंब्रा वायपास येथील धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डॉगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवीधरण परिसर, पडाळे डॅम, माळशेज घाटातील धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेवे, शहापूर तालुक्यातील भातसा धरण, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब) सापगांव नदीकिनारी कळंबे नदी किनारा, कसारा घाट, कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी, भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वन्हाडे, दहिवली, मळीचीवाडी आदी अनेक छोटीमोठी पावसाळी पर्यटनस्थळे ठाण्यानजीक आहेत.
या सर्वच पर्यटनस्थळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. साहजिकच यावेळी मद्यपी व हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या देखील या गर्दीत मोठी असते. अशा हुल्लडबाज व मद्यपी पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाय योजना आखल्या आहेत. त्यात हुल्लडबाजी करणारे व पर्यटनस्थळी मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
तसेच पर्यटनस्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मद्यपी व हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पर्यटनस्थळी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.
पावसात वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. पर्यटनस्थळाच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, महा बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे आणि उघडयावर मद्य सेवन करणे यास बंदी घालण्यात आली आहे. तर डिजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर वाजविण्यावर देखील पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. दरम्यान, पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माळशेज घाटात हुल्लडबाजी करणारे व मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर स्थानिक टोकावडे पोलीस पथक तसेच महामार्ग पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचे संयुक्त पथक तैनात केले जाणार आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊरच्या जंगलात वाहणाऱ्या धबधब्यांवर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वन विभागाने हा परिसर संरक्षित घोषित केल्याने येथे जाण्यास मनाई असतांना देखील अनेक तरुण छुप्या वाटेने येथे पोहचतात. तर पावसाळ्यात येऊर मध्ये होणाऱ्या पाट्यदिखील वाढतात. त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वन विभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी ७ वाजतापासून बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, गावातील नागरिक, वायू दलाचे अधिकारी, कर्मचारी यांनाच सायंकाळी ७ नंतर येऊरला प्रवेश देण्यात येतो अशी माहिती वन विभागाच्या येऊर प्रवेशद्वारावरील तपासणी पथकाने दिली, तसेच येऊर परिसरातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वन विभागाने बंदी घातली आहे.