

नेवाळी (ठाणे) : एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर प्लास्टिकचे थर साचलेले दिसून येत आहेत. येथील मान्सूनपूर्व कामे कासवगतीने होत असल्याने एमआयडीसीतील रस्त्यांचे नाले होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मान्सून जवळ येत असला तरी केडीएमसीची पूर्व तयारी वेग घेताना दिसून येत नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुख्य रस्त्यांवर गटारातील पाणी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसीतील फेज दोन मध्ये असलेल्या अभिनव शाळे जवळील नाल्यात प्लास्टिक, लाकडे आणि थर्माकोलचे थर जमा झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्याआधी गटार साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामांना वेग देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईला सुरुवात केली आहे. मात्र कल्याण ग्रामीण भागात असलेल्या डोंबिवली एमआयडीसीतील फेस दोन मध्ये अभिनव शाळेजवळील मुख्य नाल्यांमध्ये प्रचंड प्लास्टिक, थर्माकोल व लाकडाचे साहित्य दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने या मुख्य नाल्यांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा पावसाळ्यात मुख्य रस्ते गटारमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेली नालेसफाई चर्चेत आली आहे. त्यामुळे या दुर्लक्षित मोठ्या नाल्यांकडे केडीएमसी प्रशासनाकडून कधी गांभीर्याने लक्ष देण्यात येणार असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे.