

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या पिसवली गावातून दुचाकीवरून प्रवास करत असताना जय भीमनगर ते टाटा पॉवर भागात एका व्यक्तीने कल्याणमधील एका महिलेचा सोमवारी रात्री विनयभंग केला होता.
दुसऱ्या दिवशी पिसवली भागात त्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो व्यक्ती प्रकाश वनताळे उर्फ लल्ला असल्याची खात्रीलायक माहिती पीडित महिलेला समजली. या माहितीच्या आधारे पीडितेने मानपाडा पोलिस ठाण्यात लल्ला विरूध्द विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिला कल्याणमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहते. सोमवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही महिला दुचाकीवरून पिसवलीतील प्रवेशद्वाराच्या आतील भागातील जय भीमनगर येथून कल्याण-शिळ महामार्गावरील टाटा पॉवर नाका येथे येत होती.
दास यांच्या दुकानासमोर एक व्यक्ती रस्त्यात उभा होता. त्या व्यक्तीला पीडितेने दुचाकी जाण्यासाठी रस्त्यातून बाजुला होण्याची विनंती केली.
त्यावेळी त्याने महिलेकडे रागाने पाहून रस्ता तुझ्या वडिलांचा आहे का ? असे बोलत शिवीगाळ केली. त्यावेळी रस्ता कुणाचाच नसल्याचे उत्तर देऊन त्याला बाजुला होण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्याने पीडितेला काही कळण्याच्या आत महिलेशी भर रस्त्यात गैरवर्तन केले. महिलेची ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
हा व्यक्ती आपल्याशी आणखी काही गैरकृत्य करेल या भीतीने पीडित महिला तेथून घाईघाईने निघून गेली. दुसऱ्या दिवशी पीडित महिला आपल्या मुलाला घेऊन पिसवली भागात गेली. आपल्याशी गैरवर्तन करणारा हा व्यक्ती कोण होता याचा शोध घेऊ लागली. त्यावेळी स्थानिकांनी महिलेला त्या व्यक्तीचे छायाचित्र दाखवले.
त्यावेळी आपल्याशी गैरवर्तन करताना तोच व्यक्ती असल्याचे महिलेने ओळखले. त्या व्यक्तीचे नाव समजल्यावर महिलेने घरी येऊन पतीला रात्री घडलेला प्रकार सांगितला. पतीच्या सल्ल्याने महिलेने आपल्याशी गैरकृत्य करणाऱ्या प्रकाश वनताळे उर्फ लल्ला यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.