ठाणे : भात शेतीच्या झोडणीनंतर पावलीचा भाव घसरला; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

यंदा पावसामुळे भिजलेल्या पावलीचा भाव घसरला
खानिवडे, ठाणे
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झोडणी, वाढवणी व रब्बीसाठी लागणाऱ्या शेतीकाम खर्चाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.Pudhari News network
Published on
Updated on

खानिवडे : भात शेतीच्या झोडणीनंतर उरलेल्या तणाच्या बांधलेल्या मोदल्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची तजवीज होत असल्याने त्यांना लागणाऱ्या खर्चाला चांगला हातभार लागतो. मात्र मागील कैक वर्षात दरवाढ न झाल्याने आणि हवा तसा व अपेक्षित दर नसल्याने अवघ्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झोडणी, वाढवणी व रब्बीसाठी लागणाऱ्या शेतीकाम खर्चाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

गुरांचा चांगला चारा असलेल्या भातपिक तणांच्या मोदल्यांचा (पावली) दर घसरल्याने पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे झोडणी, मळणी, वाढवणी व भरडाईसाठी लागणाऱ्या आर्थिक हात भाराला कात्री लागली असल्याने त्या खर्चासह रब्बी हंगामात लागणाऱ्या खर्चाच्या अधिक आर्थिक तरतुदीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

पालघर जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भात शेतीला यंदा शेवटपर्यंत लांबलेल्या पावसामुळे मोठे नुकसान सोसावे लागले असतानाच आलेल्या पिकांच्या झोडण्या जिल्ह्यात जोरात सुरू आहेत. दिवाळीनंतर या झोडण्याच्या कामांनी मोठा वेग घेतला आहे. या झोडण्यानंतर उरलेल्या भाताच्या तणाचे मोदले तयार करून शेतकरी विक्री करत असतात. हे मोदले ज्यांना पालघर जिल्ह्यात पावली असे संबोधले जाते ते कैक महिने जशेच्या तसे टिकणारे असल्याने आणि जनावरांना आवडणारे खाद्य असल्याने या मोदल्यांना दुग्धोत्पादन करणाऱ्यांकडून मोठी मागणी असते. यासाठी शेतखळ्यात येऊन शेतकऱ्यांकडून खरेदी करून नेणारे खरेदीदार रोखीने हे मोदले खरेदी करतात.

पावली विक्रीतून मिळणाऱ्या रोखीतून शेतकरी झोडणी, मळणी, वाढवणी व भरडाई साठी लागणारी तसेच रब्बी पिकांसाठी लागणारी मजुरी भागवतात. वसईसह मुंबईतील खासगी दुग्ध उत्पादकांकडून भाताच्या मोदल्यांना चांगली मागणी असल्याने या मोसमात त्यांना हे मोदले पुरवठा करणाऱ्यांना ही यातून रोजगार मिळतो. हे पुरवठादार झोडणी चालू असलेल्या शेतकऱ्याच्या शेत खळ्यात आपले वाहन घेऊन येतात व मोदल्याच्या दर्जाप्रमाणे दर देतात. मात्र चालू वर्षी शेतातच भिजलेल्या भाताच्या तणाचा दर्जा हा चांगल्या चाऱ्याचा नसल्याने त्याच्या मोदल्यांचा दर घसरला आहे. मोदला जर चांगल्या प्रतीचा असेल तर एका मोदल्यासाठीं साधारण 30 ते 35 रुपयांचा दर मिळतो. मात्र भिजलेल्या मोदल्यांमुळे दर घसरण होऊन आता शेतकऱ्यांच्या हातात 15 ते 25 रुपये मिळत आहेत. शेतीच्या कसदार पणा प्रमाणे दर एकरामागे साधारण 150 ते 200 मोदले निर्माण होतात व शेतकऱ्याला 5 ते 7 हजार रुपये मिळतात. मात्र चालू वर्षी दर घसरणीमुळे दीड हजार ते तीन हजार रुपये मिळत असल्याने 3 ते 5 हजारांची शेतकऱ्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे.

यंदा परतीच्या जोरदार 66 पावसाने भिजलेल्या तणाची पावली काळी पडल्याने मोबदल्यांच्या भावात घसरण झाली आहे. याचा फटका आम्हाला बसल्याने शेती खर्चाची अधिक तरतूद करावी लागत आहे.

भगवान किणी, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news