

मोखाडा : हनिफ शेख
एकीकडे मोखाडा तालुक्यात बालमृत्य आणि मातामृत्यूचे दृष्टचक्र सुरू असताना हे आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा सक्षम करणे तसेच विविध पॅटर्न राबवणे आवश्यक असताना दुसरीकडे मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील मंजूर 7 वैद्यकीय अधिकार्यांची सर्वच्या सर्व पद रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायम पदांपैकी वैद्यकीय अधीक्षक हे एकमेव पद भरलेले असल्याची परिस्थिती आहे.
मोखाडा तालुक्यात नुकतेच एक बालमृत्यूचे प्रकरण घडले यानंतर याबाबत अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी मधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या बातम्या कशा खोट्या याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सक यांनी तात्काळ पालघर येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारी उत्तरे देऊन आणि कागदी घोडे नाचवून स्वतःची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मग आता शल्य चिकित्सक यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील अवस्था आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदाबाबत एक पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी असे आवाहन येथील सर्व सामान्य नागरिक करीत आहेत.
मोखाडा तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 16 उपकेंद्र आणि भरारी पथके अशी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात काम करते. मात्र याठिकाणी प्राथमिक उपचार होण्या इतकीच साधन सामुग्री असल्याने जवळपास 70टक्के रुग्णांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. याशिवाय प्रसूतीसाठी तर मोखाडा तिथून जव्हार आणि मग नाशिक असा 100 किमीचा प्रवास करावा लागत असल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत. असे असताना संपूर्ण तालुक्याची आरोग्य वाहिनी असलेल्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रचंड रुग्णांचा भार आहे. यात महत्वाचे म्हणजे एका महिन्यात तब्बल 70च्या आसपास माता प्रसूती होत असतात. याशिवाय साथीचे रोग, जिकिरीचे रुग्ण वेगळे कारण दररोज शेकडोंच्या संख्येने ओपीडी या रुग्णालयाची असते अशावेळी येथे कायमस्वरूपी तसेच बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ अशा वैद्यकीय अधिकार्यांची प्रचंड गरज आहे. मात्र दुर्गम भाग, राहण्याची सोय नाही.कुटुंबांची सोय नाही अशी कारणे देऊन अनेक वैद्यकीय अधिकारी याभागात येण्याचे टाळतात किंबहुना आहेत ते रुजू झाल्यापासून बदली करण्याच्या प्रयत्नात असतात.
यामुळे महत्त्वाची सर्वच वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने सध्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांवर या रुग्णालयाचा भार आहे. याठिकाणी आरोग्य राज्यमंत्री यांचा दौरा झाला अनेक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे दौरे होत असतात. मात्र एवढी गंभीर बाब असताना याकडे कोणाचेच कसे लक्ष नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे यामुळे याभागातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्य रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असताना चक्क एका रूग्णालयातील 7 वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या या कृतीचा सर्व सामान्यांमधून निषेध व्यक्त होत आहे.
सध्या मोखाडा ग्रामीण रुग्णालय कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने करार पद्धतीने शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर काम चालवले जात आहे एवढेच काय प्रसूती विभाग हा केवळ नर्सेच्या कौशल्याने चालवला जात आहे. यामुळे रात्रीच्या वेळी काही जिकिरीची परिस्थिती निर्माण झाली तर मार्गदर्शन नेमके कोणाचे घ्यायचे हा सवाल उभा राहतो. कुवर कुटुंबियांनी आपले बाळ गमावल्यानंतर त्याच आठवड्यात अजून दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे ससजते.
आदिवासी दुर्गम भागात कोणीही डॉक्टर येण्यास तयार होत नाही.कारण काही महिन्यापूर्वी येथील कायमस्वरूपी असलेल्या तीन वैद्यकीय अधिकार्यांचा बदल्या केल्या गेल्या त्या बदल्यात डॉक्टर का देण्यात आले नाही? जर बदली डॉक्टर नाही मग या डॉक्टरांना कोणत्या नियमात सोडण्यात आले असा सवाल उपस्थीत होत आहे.