Thane Online Fraud : डोंबिवलीत ऑनलाईनद्वारे फसवणूक करणारी टोळी सक्रिय

अल्पवयीन ठगांविरोधात कारवाईची मागणी ; दुकानदारांची पोलिसांकडे कैफियत
क्राईम
क्राईमPudhari File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली परिसरात खरेदी केलेल्या सामानाच्या माध्यमातून दुकानदारांची ऑनलाईनद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारामुळे दुकानदार वर्ग हैराण आहे. अनेक दुकानदारांनी याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यांत तक्रारी केल्या आहेत.

पश्चिम डोंबिवलीकडे असलेल्या जुनी डोंबिलीतील डाॅ. नेमाडे गल्ली भागात रविवारी संध्याकाळी दुकानदार सायली सावंत यांची दोघा अल्पवयीन मुलांनी 1 हजार 575 रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुनी डोंबिवलीच्या डाॅ. नेमाडे गल्लीतील एका गाळ्यात सायली सावंत या कोकणात तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची विक्री करतात. रविवारी संंध्याकाळी दोन मुले त्यांच्या दुकानात आली. त्यांनी सायली सावंत यांच्या दुकानात विविध प्रकारचे 575 रूपयांचे सामान खरेदी केले. या सामानाचे पैसे देण्याऐवजी त्यांनी सायली यांच्याकडून वाढीव एक हजार रूपये रोख मागून घेतले. एक हजार रूपये आणि सामानाचे असे एकूण 1 हजार 575 रूपये ऑनलाईन पध्दतीने तात्काळ पाठवितो असे दुकानदार महिलेला सांगितले. दुकानासमोर उभे राहूनच दोन्ही मुलांनी सायली यांच्या मोबाईलवर एक बनावट मेसेज पाठवून 1 हजार 575 रूपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले असल्याचे दर्शविले. सायली यांनी खरेदीदार मुले दुकानातून गेल्यानंतर मोबाईलवर आलेल्या मेसेजची पडताळणी केली आणि बँक खात्यात पैसे जमा झालेत का म्हणून खात्री केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सोमवारी सकाळी सायली सावंत यांनी या फसवणूक प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

शिक्षणाच्या वयातच ठगेगिरी

शिकण्याचे वय असलेली मुले दुकानात बसलेल्या महिला, ज्येष्ठ, वृध्द यांना टार्गेट करतात. अशी मंडळी दुकानात असताना सामान खरेदीच्या बहाण्याने मुले येतात. 500 हून अधिक रकमेचे किराणा सामान खरेदी केल्यानंतर आम्हाला रोख रकमेची गरज आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला एक ते दोन हजार रूपये द्या. म्हणजे सामान खरेदीचे पैसे आणि तुमच्याकडून घेतलेले पैसे असे एकूण रक्कम आम्ही तुम्हाला समोरच ऑनलाईनद्वारे पाठवितो, अशी दुकानदाराला थापेबाजी करतात. पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज पाठवल्याचे दुकानदाराला दाखवतात. दुकानदाराला मेसेज येताच त्याला ग्राहकाकडून पैसे मिळाल्याचे वाटते. मात्र नंतर जेव्हा दुकानदार त्याच्या बँक खात्यात ग्राहकाने ऑनलाईनद्वारे पाठविलेले पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासल्यावर दुकानदाराकडे कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नसतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news