ठाणे : मध्य वैतरणा धरणातील विसर्गामूळे एक व्यक्ती गेली वाहून

एक मुलगी बचावली; बेपत्ता व्यक्तिचा शोध जारी
ठाणे
मध्य वैतरणा धरणांतून कोणतीही पूर्वसूचना न देता विसर्ग करण्यात आलाpudhari news network
Published on
Updated on

खोडाळा : मध्य वैतरणा धरणांतून कोणतीही पूर्वसूचना न देता अवचित मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे येथील लोखंडी सांगाड्यावरुन मार्गक्रमण करणारे भास्कर नाथा पादीर (वय 40 वर्षे), रुचिका भाऊ पवार (वय 8 वर्षे) हे दोघेही पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून जात होते. यात भास्कर नाथा पादीर हे वाहून गेले असून रुचिकाला वाचवण्यात यश आले आहे. भास्कर पादीर यांचा सावर्डे येथील ग्रामस्थ कसून शोध घेत आहेत. अद्यापही पादीर यांचा शोध लागलेला नाही. भास्कर पादीर आणि रुचिका पवार हे सावर्डे येथील रहिवासी असून ते कसारा येथून आपल्या घरी सावर्डे येथे परतत असताना शनिवार,दि. 7 रोजी ही दुर्घटना घडली आहे.

सरकारी माहितीनुसार शुक्रवार दि 6 रोजीच्या रात्री उशीरा पर्यंत मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग करण्यात आला नव्हता. मात्र शनिवार संध्याकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सुचणा न देता अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेला आहे. काही लोक संध्याकाळी कामाहून शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथे गावी परतत असतात. मात्र येथील धोकादायक पुलाच्या दुतर्फा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही.

अशाच प्रकारे सावर्डे पूल ओलांडून घरी जात असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. या प्रवाहातून भास्कर पाधीर व रुचिका ही 7 वर्षाची लहान मुलगी असे दोघं पुलावरून बेसावध जात असताना भास्कर पादीर यांनी सोबतच्या रुचिकाला प्रवाह वाढल्याने खांद्यावर उचलून घेतले परंतु पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना तोल सांभाळता आला नाही. यातच ते वाहून गेले आहेत. अगदी शेवटच्या क्षणी काठावरील माणसांनी रुचिकाला हात देत सावरल्याने रुचिकाला सुखरूप बाहेर काढता आले आहे. मात्र भास्कर यांचा शोध उशीरा पर्यंत चालूच होता.

3 वर्षांत 8 घटना

दापूरे, सावरखुट आदि भागातील नागरिकांची येथून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मागील अनेक वर्षांपासून वाहून जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या 3 वर्षातील ही 8 वी घटना असून 3 वर्षात मंगळू सक्रू वारे, राहणार सावरखुट, कल्पना पुनाजी झोले, सावर्डे, घनःश्याम राम गुंड, सावर्डे तर किनिस्ते येथील शिद (पुर्ण नाव माहित नाही) तसेच कसारा येथील एक व्यक्ती आपल्या सासूरवाडीला सावर्डे येथे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले आहेत. अशा 8 व्यक्तिंनी आपले प्राण गमावले आहेत.

आमचे जीव कवडीमोल आहेत का?

मध्य वैतरणा किंवा मोडकसागर धरणातून पाण्याचा विसर्ग करतांना कोचाळे, करोळ, पाचघर व सावर्डे या गावासह धरणक्षेत्रातील लगतच्या गावांना पुर्वसुचना देण्याची नैतिक जबाबदारी असतांनाही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्याबाबत आज तागायत कोणतीही ही खबरदारी घेतली नाही. त्याबाबत जाब विचारण्यासाठी सावर्डे येथील ग्रामस्थांनी थेट मध्य वैतरणा धरण गाठले मात्र प्रवेशद्वारावरच मुजोर द्वार रक्षकांनी त्यांची वाट अडवून धरली होती. यावेळी याठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे आम्ही नेमकी कोणाकडे दाद मागायची? आमचे जीव एवढे कवडीमोल आहेत का? असा उद्विग्न सवाल सावर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच हनूमंत पादीर यांनी उपस्थित केला आहे.

जीवरक्षक दल तैनात करण्याची मागणी

मध्य वैतरणा धरण परिसरात प्रेतं सापडणे, प्रेतांची विल्हेवाट लावणे त्याशिवाय हौसी पर्यटकांचा बुडून मृत्यू होणे या लगतच्या काळातील ताज्या घटना आहेत. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील एका पर्यटक तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी आणि स्थानिक पोलिसांनी शिकस्तीने मृतदेह शोधला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे ही महापालिकेची व शासनाची जबाबदारी आहे. सातत्याने घडत असलेली जीवीत हानी लक्षात घेऊन खास अत्यावश्यक बाब म्हणून मध्य वैतरणा येथे कायम जीव रक्षक दल तैनात करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news