

बदलापूर : बदलापुरात एका बॉडीगार्डने दुसर्या बॉडीगार्डची बंदूक चोरल्याची घटना घडली आहे. हे दोघेही बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचे बॉडीगार्ड असून आपापसातील वादामुळे हा प्रकार केल्याची कबुली आरोपी बॉडीगार्डने दिली आहे.
बदलापूरचे शिवसेना शहर- प्रमुख वामन म्हात्रेंकडे जजलाल बुलंद पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी हे दोघेही खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करतात. या दोघांकडेही परवाना असलेल्या बंदुका आहेत. यापैकी कृष्णा प्रसाद तिवारी हा 14 मार्च रोजी होळीच्या दिवशी ड्युटी संपवून वामन म्हात्रेंच्या एरंजाड येथील फार्महाऊसवर आराम करत होता. यावेळी त्याची 8 काडतुसं असलेली पिस्टल उशीखाली ठेवली होती. तो काही वेळाने उठून अंघोळीला गेला, मात्र आल्यानंतर त्याला त्याची पिस्टल आणि मोबाईल गहाळ असल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना म्हात्रेंचा दुसरा बॉडीगार्ड जजलाल पांडे याच्यावर संशय आल्याने त्यांनी पांडेला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपणच तिवारी याला अडचणीत आणण्यासाठी त्याची बंदूक आणि मोबाईल लपवल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कृष्णाप्रसाद तिवारी याची पिस्टल, 4 काडतुसं, मोबाईल, तसेच स्वतः आरोपी पांडे याची रिव्हॉल्व्हर, 18 जिवंत काडतुसं, 7 रिकाम्या पुंगळ्या आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.