विक्रमगड : नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 40 ते 50 रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. अन्य फुलांचे भावही वधारले आहेत.
नवरात्रोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असते. निशिगंध, झेंडू, गलांडा, लीली, गुलाब या पारंपरिक फुलांसह जरबेरा, कॉर्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही मोठी मागणी असते. त्यामुळे या काळामध्ये बाजारात दर दुपटीने वाढले आहेत. मोठ्या आकारांची मूर्ती असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसह, घरगुती पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फुलझाडे अधिक प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात फुलांची शेती फार मोठ्या प्रमाणात केली जात नाही. यासाठी वातावरण पोषक नाही. मात्र, विक्रमगड तालुक्यात काही ठिकाणी शेतकरी रानमालावर झेंडूची लागवड करतात. मात्र सततच्या पावसामुळे सध्या तरी झेंडूच्या फुलांचे उत्पादन सुरू झाले नाही.
फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान 150 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत फुलांच्या हाराची किमत आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गा मातेच्या मूर्तीसाठीच्या हारांचे दर किमान 200 रुपयांपासून एक ते दीड हजारांपर्यंत आहेत. 40 रुपये किलो मिळणारा झेंडू 100 ते 120 रुपये किलो आहे. मूर्ती पूजनासाठी लाल व पांढर्या फुलांना मागणी असल्याने फुलांचे दर सध्या वाढले आहेत.