ठाणे : सॅटिस पूर्व प्रकल्पा अंतर्गत रेल्वेच्या मार्गिकेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने यासाठी जुना कोपरी पुल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. जुना कोपरी उड्डाणपूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल असून 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशिष्ट वेळेसाठी हा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे पूर्व भागातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापापालिकेच्या वतीने सॅटिस पूर्व प्रकल्प राबवण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. ठाणे महापालिका आणि रेल्वे अशा दोन्ही यंत्रणा मिळून सॅटिस पूर्व प्रकल्पाचे काम सुरु असून यासाठी तब्बल 260 कोटींचा खर्च केला जाणारा आहे. या प्रकल्पाचे कामही प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या खांबांवर गर्डर टाकण्याचे काम प्रलंबित होते. काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र आता हे काम करण्यात येणार असल्याने यासाठी 23 जुलै ते ऑगस्ट पर्यंत जुना कोपरी उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीने घेण्यात आला आहे.
या कामाच्या दरम्यान वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाने एक अधिसूचना काढली असून यामध्ये कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.
ठाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार्या सर्व वाहनांना भास्कर कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंद नगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जाता येणार आहे. तीन हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल मार्गे ठाणे पूर्व भागात येणार्या सर्व वाहनांना भास्कर कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
ही सर्व वाहने गुरुद्वारा, आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. मुंबई वरून हरिओम नगर मार्गे ठाणे पूर्वेकडे येणार्या सर्व वाहनांना हरिओम कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहने आनंद नगर येथील पुढे सरळ तीन हात नाका येथून युटर्न घेऊन आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.