

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या ठाकुर्ली आणि चोळेगाव हद्दीत दीपेश म्हात्रे यांचे राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे जाहिरात बॅनर्स रस्त्यांवर लावण्यास सक्त मनाई करण्याचा निर्णय चोळेगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. शनिवार (दि.5) पासून अशा सक्त मनाईचे आदेश ठाकुर्ली आणि चोळेगाव हद्दीतील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये झळकत आहेत. या लक्षवेधी बॅनर्सद्वारे ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत दीपेश म्हात्रे यांना जणू काही नो एंट्री करण्यात आली आहे.
शिवसेनेचे युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून दीपेश म्हात्रे यांनी रविवारी त्यांच्या समर्थकांसह मातोश्री येथे उद्धव सेनेत प्रवेश केला. आई अंबाबाई गोंधळाला ये असा संदेश देणार्या दीपेश म्हात्रे यांच्या नवरात्रोत्सव बॅनर्सवर शिंदे गटातील कोणत्याही नेत्याचे फोटो नव्हते. या बॅनर्समार्फत म्हात्रे यांनी शिंदे सेना सोडण्याचा सूचक संदेश दिला होता. दरम्यान ठाकुर्ली, चोळेगाव भागात त्यांना नो एंट्रीचे बॅनर्स लागले आहेत.