

ठाणे : लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मंजुरी मिळाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. (Maharashtra has become the first state in the country to give justice newspaper vendors)
याचे औचित्य साधून गुरुवारी (दि.10) ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात गेली सहा वर्षे यासाठी पाठपुरावा करणार्या आ. संजय केळकर यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्यावतीने जाहिर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिवहन सदस्य विकास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वृत्तपत्र विक्रेते संजय सातार्डेकर, वैभव म्हात्रे, शरद पवार, समीर कोरे , दिलीप चिंचोले, संदीप अवारे, विवेक इसामे, बंडू कदम, अजय मोरे आदी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आ.संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनानी सरकारकडे केली होती.
महाराष्ट्रात अडीच लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत तर देशभरात दीड ते दोन कोटी वृत्तपत्र आहेत. ऊन,वारा, पावसाची तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र पोहचवणार्या या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ होणे गरजेचे होते. अखेर, महायुती सरकारने मंजुरी दिली असल्याने याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल. असा विश्वास व्यक्त करून आ. संजय केळकर यांनी, अन्य राज्यातीलही वृत्तपत्र विक्रेत्यांचे दुरध्वनी येत असल्याचे सांगितले.